MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel News : रामगिरी महाराज, राणेंच्या विरोधातील रॅलीतून एमआयएमचा व्होट बॅंक राखण्याचा प्रयत्न

Jagdish Pansare

AIMIM Political News : महाविकास आघाडीकडे वळलेला मुस्लिम मतदार एमआयएमची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात एमआयएमच्या पाठीशी उभा राहिला होता. मराठवाडाच नाही, तर अगदी महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यात मुस्लिम समाजातील विशेषतः तरुण मतदारांची पहिली पसंती एमआयएमला आहे. हैदराबाद मार्गे महाराष्ट्रातील नांदेडमधून दहा वर्षापुर्वी दाखल झालेल्या एमआयएमने मराठवाड्यात आपला जम बसवला होता.

अगदी मोठ्या निवडणुकांमध्ये नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये या पक्षाने चांगले यश मिळवले. नांदेड महापालिकेत पदार्पणात मिळवलेले यश, छत्रपती संभाजीनगरमध्ये आधी आमदार, मग खासदार आणि महापालिकेत विरोधी पक्षाच्या भुमिकेत (AIMIM) एमआयएम राहिली. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात एमआयएमला मुस्लिम मतदारांनी डोक्यावर घेतल्याचे वारंवार दिसून आले होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळवलेल्या विजयाने तर एमआयएमची हवा संपुर्ण राज्यात आणि देशात झाली.

महाराष्ट्रातून एकमेव खासदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने निवडून गेला. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरात एमआयएमची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर शहरातील पुर्व, मध्य या दोन मतदारसंघात इम्तियाज जलील यांना विजयी उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली. हे पाहता येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांनी एमआयएमची साथ सोडत महाविकास आघाडीच्या पारड्यात आपली मते टाकल्याने एमआयएमची चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी किंवा इतर कुठल्याही पक्षाची साथ न घेता इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी स्वबळावर 3 लाख 41 हजार मते मिळवली. म्हणजेच वंचित आघाडीसोबत असताना 2019 मध्ये मिळवलेल्या 3 लाख 89 हजार मतांच्या 80 टक्के.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संदीपान भुमरे यांना एकगठ्ठा मतदान झाल्यामुळे इम्तियाज जलील पराभूत झाले, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतदार इम्तियाज जलील यांच्या पाठीशी राहिला, पण राज्यातील बहुतांश मतदारसंघात एमआयएमची व्होट बॅंक असलेला मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे वळला. परभणी, नांदेड, धाराशिव, जालना या मतदारसंघात हे स्पष्टपणे दिसून आले. अशावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा हा मतदार एमआयएमकडे कसा वळेल? याचा प्रयत्न पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून इम्तियाज जलील यांच्याकडून सुरू आहेत.

अशातच सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारी वक्तव्य करत एमआयएमला ही संधी उपलब्ध करून दिली. रामगिरी महाराज, नितेश राणे यांच्या अटकेची मागणी करत इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज समृद्धी महामार्गावरून हजारो वाहने व त्यातून एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी आपली ही रॅली असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले होते.

मुस्लिम धर्मीयांचा अपमान करत चिथावणीखोर विधान करणाऱ्या रामगिरी महाराज व नितेश राणे यांना अटक करा, अशी मागणी या निमित्ताने एमआयएमने केली आहे. ही रॅली यशस्वी झाली, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे चांगले परिणाम एमआयएमला दिसतील अशी अपेक्षा आहे. एमआयएमला मत म्हणजे भाजपला मदत हा नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली. परिणामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाला मुस्लिम मतदारांनी भरभरून मते दिली.

एमआयएमकडे वळलेली व्होट बॅंक महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर आम्हाला सोबत घ्या, अशी साद एमआयएमने आघाडीच्या नेत्यांना घातली. पण जातीयवादाचा शिक्का बसलेल्या एमआयएमला सोबत घेणे म्हणजे इतर मते गमावण्याचा धोका, हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीने एमआयएमला दूरच ठेवले. कोणताच राजकीय पक्ष, आघाडी जवळ करत नसल्याने वेळ न दवडता एमआयएमने आता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला आहे.

मुंबईकडे निघालेली रॅली यशस्वी झाली तर महाविकास आघाडी एमआयएमला सोबत घेण्याचा विचार करू शकते, असा आशावाद इम्तियाज जलील व ओवेसी यांना आहे. तसे झाले नाही, तरी काही प्रमाणात का होईना, महाविकास आघाडीकडे वळलेला मुस्लिम मतदार पुन्हा आपल्या सोबत येईल, अशी एमआयएमची धारणा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT