Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

NCP politics : राष्ट्रवादीच्या दहा जणांचा होणार होता शपथविधी; पण 'त्या' आमदाराने नकार दिल्याने नऊ जणांनीच घेतली शपथ

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली.

सरकारनामा ब्यूरो

पांडुरंग म्हस्के

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांच्या गटाकडून करण्यात येत असला, तरी अजूनही आमदार फोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.

विशेष, म्हणजे गेल्या रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजीत पवार यांच्यासह दहाजणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार होती. यामध्ये अनिल देशमुख यांच्यासह अन्य दोन आमदारांची नावे दहावा मंत्री म्हणून असल्याची माहिती पुढे येत आहे. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) रामराम ठोकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आपल्याबरोबर अधिकाधिक आमदार यावेत असा प्रयत्न अजित पवार यांचा सुरुवातीपासूनच होता.

त्यासाठी त्यांनी सरकारमधील भाजपा (BJP) आणि शिंदे गट यांच्या प्रमाणेच आपल्यालाही दहा मंत्रीपदे मिळावीत, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह दहा मंत्रीपदे मागितली होती. मात्र, प्रत्यक्षात नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या यादीत दहावे नाव अनिल देशमुख यांचे होते. मात्र, देशमुख आपल्याबरोबर येतील याची खात्री नसल्याने आणखी दोन आमदारांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली होती.

अनिल देशमुख हे शपथविधीच्या दिवशी राजभवनावर दिसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी मंत्रिदाची शपथ घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर ते सरळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे निघून आले. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाकडून आणखी दोन आमदारांना मंत्रिपदाबाबत विचारणा करण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यांनीही नकार दिल्याने अखेर उपमुख्यमंत्रीपदासह केवळ नऊ जणांचाच शपथविधी यावेळी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील रविवारी शपथविधी होण्यापूर्वी पक्षातील अनेक आमदारांना खुद्द भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक आमदारांच्या साह्याने संपर्क करण्यात आला होता. त्यात त्यांना भाजपाच्या वतीने मंत्रिपदासह मतदारसंघातील कामे करून देण्याबाबत आणि अधिक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत निकटचे संबंध असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना यावेळी संपर्क करण्यात आला. मात्र संबंध असले, तरी विचारधारेच्या मुद्द्यावर काही आमदारांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आमदार फोडण्याचे अजित पवार यांचे प्रयत्न अद्यापही सुरु असून अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. केवळ आमदारच नाही, तर अन्य पदाधिकारीही आपल्याकडे आणण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. मागील रविवारी शपविधीच्यावेळी अजित पवार यांच्याकडे लहामटे गेले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांनी पुन्हा पलटी मारली असून ते अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर त्यांनी सह्याही केल्या आहेत.

शरद पवार यांच्या मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली होती. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री त्यांची अजित पवार यांच्याशी भेट झाली असून त्यांच्याशी चर्चा झाली. अकोल्यात काय विकास कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT