Pune News : Eknath Shinde
Pune News : Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News:मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंच्या टार्गेटवर विरोधक? १० महिन्यांमध्ये बालेकिल्ल्यात तब्बल...

सरकारनामा ब्यूरो

Thane News : मागच्या जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि राज्यात भाजप शिवसेना युतीचं नवीन सरकार सत्तेत आलं. यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. यानंतर वारंवार विरोधकांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते खासदार, संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेत्यांकडून कायदा सुव्यवस्थेवरुन शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा कायमच प्रयत्न केला जात आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा ठपकाही ठेवण्यात येत आहे.

याचदरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या विरोधातील नेत्यांवर मागील 10 महिन्यांत तब्बल 25 गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात 25 गुन्हे दाखल करण्यात आल्या आहेत. यात 25 पैकी 21 गुन्हे हे सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या टीका, बॅनरबाजी विरोधात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर सुरुवातीला 11 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्या कमी करण्यात आल्या. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिंदे गटावरही गुन्हे...

भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शिंदे गटाकडून देखील रोशनी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. तसेच नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त जयजित सिंह यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी त्यांनी सबंधित शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT