Gopichand Padalkar-Ajit Pawar News  Sarkarnama
मुंबई

NCP Ajit Pawar Group Vs Padalkar : आमदार पडळकरांच्या पवार कुटुंबावरील खोचक टीकेनंतर अजित पवार गट संतापला, दिला 'हा' इशारा

Deepak Kulkarni

Pune : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाद नवीन नाही. त्यांच्याकडून कायमच पवार कुटुंबावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. आता पुन्हा एकदा पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारांचा मोठा गट सोबत घेऊन शिंदे - फडणवीस- पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भाजप आमदार पडळकर यांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना पवार कुटुंबावर हल्ला चढविला होता. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी, रुपाली पाटील ठोंबरे यांनी पडळकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार समर्थक नेत्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही. आता पडळकरांनी माफी मागितली तरी माफी दिली जाणार नाही. ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ असा पवित्रा घेतला आहे. पडळकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवरील टीकेमुळे सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटाची नाराजी ओढवण्याची शक्यता आहे.

सुनील तटकरे म्हणाले, '' विकृत मनोवृत्तीचा हा...''

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. तटकरे म्हणाले, पडळकर हा विकृत मनोवृत्तीचा हा माणूस आहे. भाजपने या विकृत माणसावर कारवाई करावी. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करत आहे. भाजपानं यावर कारवाई करावी. आम्ही याचा कडक शब्दांत निषेध करतो असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.

तसेच आम्ही या विकृत माणसाला विचारुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला नसल्याचेही तटकरेंनी यावेळी सांगितले.

''...तर जशास तसे उत्तर मिळणार !''

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे म्हणाल्या, लोकांमधून निवडून येणारे आमदार अजित पवार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला कुत्रासुद्धा भीक घालत नाही. त्यांच्या पक्षाने अशा लोकांना तंबी दिली पाहिजे, नाहीतर गोपीचंद पडळकर सारखी डुक्करं घाणच खाणार असा हल्लाबोल त्यांनी केला.

याचवेळी गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे आणि यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं असून तो बांडगुळ वृत्तीचा माणूस आहे. पडळकर यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून ते सातत्याने अजित पवार, शरद पवारांवर बोलतात. राजकारणात महिलांबाबत बोलताना आदर ठेऊन बोलावं. बेताल वक्तव्य कराल तरं जशास तसे उत्तर दिलं जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले अमोल मिटकरी ?

विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो. तुमचा पालतू कुत्रा हा औकातीच्या बाहेर भुंकला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्रचोर अशी आहे. जो समाजाचा होऊ शकला नाही. जो सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही. देवाचाही होऊ शकला नाही, त्याला तुम्ही वेसन घाला, अन्यथा याला वेसन घालण्याची क्षमता अजित पवारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे.

अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहिल्यानंतर बारामतीकरांनी त्याला त्याची लायकी दाखवून दिली आहे. तुम्ही जर आवर घालत नसाल तर आम्हालाही आवरणे तुम्हाला कठीण होईल, ही आमची सूचना आणि इशारा असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते...?

धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पण, अजित पवारांना पत्र लिहिलं नाही. याबद्दल प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही आणि त्यांना कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची भाजपाने फसवणूक केली या टीकेचा समाचार घेताना पडळकर म्हणाले, ही लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत. अशी सडकून टीका पडळकर यांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT