Ajit Pawar-Shalinitai Patil Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजित पवार पुढच्या तीन महिन्यांत जेलमध्ये असतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Shalinitai Patil Allegations : 'शिखर बॅंकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार अजित पवार आहेत. हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे'

Vijaykumar Dudhale

Mumbai News : आगामी तीन ते चार महिन्यांत अजित पवार हे जेलमध्ये असतील. त्यामुळे ते पुढची कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. अजित पवार यांच्या विरोधात पुढच्या तीन दिवसांत माझे 10 अर्ज उच्च न्यायालयात दाखल होतील, असा इशारा माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी दिला. (Ajit Pawar will be in jail in next three months: Shalinitai Patil)

शालिनीताई पाटील म्हणाल्या की, राज्य सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत होते. त्यावेळी अजित पवार यांंनी तब्बल 45 सहकारी साखर कारखाने लिलावाद्वारे विकून टाकले. त्यात माझा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना होता. आमच्याकडून तीन कोटींच्या कर्जाचा हप्ता थकल्यामुळे त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव काढला. त्यावेळी माझ्या कारखान्याची शिखर बॅंकेत 8 कोटी रुपयांची ठेव होती. त्यावेळी अजित पवार यांनी वेगवेगळ्या नावांनी 13 कारखाने विकत घेतले आहेत. ((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!))

आमच्या कारखान्यावरील कारवाईच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो. त्यावेळी शिखर बॅंकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार हे अजित पवार आहेत, हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले. आम्हाला एफआयआर दाखल करण्याची परवानगी मिळाली. आम्ही एफआयआर दाखल केला, ही घटना ऑगस्ट 2019 मधील आहे. त्याला पाच वर्षे झाली, काहीही झालं नाही. कारण अजित पवार हे सत्तेवर आहेत, असा दावाही शालिनाताई पाटील यांनी केला.

अजित पवार यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला सीटी सिव्हिल कोर्टात पाठवून शिखर बॅंकेतील गैरव्यवहार हा फार लहान विषय आहे, तो कामकाजातून काढून टाकावा, अशी मागणी केली. हा अधिकारी स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा समजतो का?, त्याच्या कामाचा हा काय भाग आहे का? त्या अधिकाऱ्याला तर मी सोडणारच नाही. त्याला आणि अजित पवार यांना जन्मठेपेची शिक्षा होईल, असे भाकितही त्यांनी वर्तविले.

पुढच्या तीन दिवसांत अजित पवार यांच्या विरोधात माझे दहा अर्ज उच्च न्यायालयात दाखल होतील. उच्च आणि सर्वोच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिखर बॅंकेतील 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्यावर एफआरआय दाखल केलेला आहे. त्याचे चार्जशीट भरून अजित पवार यांना कोर्टासमोर उभं करावं. हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, अशी विनंती मी करणार आहे, असेही माजी मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

माझ्या संस्थेची मालमत्ता (जरंडेश्वर कारखाना) ईडीच्या ताब्यात आहे. तो कारखाना आमचा आम्हाला द्यावा. तो आम्ही चालवतो. ईडीही भारत सरकारच्या अखत्यारित येते आणि मोदींवर माझा विश्वास राहिलेला नाही. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची सुपारी दिली आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं. हे सुपारीचे राजकारण आम्हाला पसंत नाही. तुम्ही ज्यांना उपमुख्यमंत्री केलं, ते काय योग्यतेचे आहेत. असा सवालाही शालिनीताई पाटील यांनी केला.

शालिनीताई पाटील म्हणाल्या की, तीन कोटींसाठी जरंडेश्वरचा लिलाव काढला, त्यावेळी माझे शिखर बॅंकेत आठ कोटी जमा होते. 2006 पासून बॅंकेच्या नियमाप्रमाणे ते तीन वेळा दामदुप्पट झाले. त्यामुळे शिखर बॅंकेकडून आम्हाला ६४ कोटी रुपये मिळावेत, यासाठी दावा करणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT