Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : अजित पवारांचीही आमदारकी जाणार; शिवसेना नेत्याचे मोठे विधान

Vijaykumar Dudhale

New Delhi : ‘जर तुम्ही कायद्याने वागणार असाल तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आमदारकी जाणार आहे,’ असे विधान शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केले. (Ajit Pawar's MLA will also be cancelled: Shiv Sena leader's big statement)

खासदार राऊत म्हणाले की, "एकनाथ शिंदे हे बेकायदा पध्दतीने मुख्यमंत्री झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले तर ते पाच मिनिटसुद्धा मुख्यमंत्रिपदावर राहू शकत नाहीत. तुम्ही काय सांगता पाच वर्षांचं. त्यांना बेकायदा त्या पदावर बसवलं आहे. तुम्ही राज्यघटनेतील तरतुदींनुसार वागणार असाल तर अजित पवारांचीसुद्धा आमदारकी जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना २०२४ मध्ये फार मोठा धक्का बसू शकतो."

पाच वर्षांसाठी अजितदादांना मुख्यमंत्री करणार, या फडणवीसांच्या विधानाचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, "तुम्ही काय त्यांच्यावर छत्रचामरं धरत बसणार का, मिस्टर फडणवीस. ज्या पद्धतीने तुम्हीच तुमचा अपमान करून घेता. ज्या पद्धतीने दिल्लीनं तुमचं मातेरं आणि पोतेरं केलं आहे, त्याची आम्हाला लाज वाटते. तुमची दया येते."

शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपकडून तडजोडी केल्या जात आहेत. महाराष्ट्र चोर, लुटारू आणि दरोडेखोरांच्या हातात गेला तर चालेल, अशी भूमिका भाजपने घेतलेली दिसत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू असताना हे सत्तेतील तीनही पक्ष रुसवे-फुगवे यांच्यात अडकले होते. कोणाला पालकमंत्रिपद, कुणाला मंत्रिमंडळ विस्तार, तर कोणाला महामंडळाचे वाटप हवे आहे. हे सरकार त्यापुढे सरकायला तयार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस मी राजकारणात पाहिला नाही, असं दुर्दैवाने मला म्हणावं लागतं. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोचेल, अशी वक्तव्ये ते सतत करतात. यापलिकडे फडणवीस यांनी गेल्या दीड वर्षांत काहीही केलेले नाही. कधी उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का पोचविणारी वक्तव्ये करायची, कधी शरद पवारांच्या प्रतिमेला तडे देणारी वक्तव्य केली जात आहेत.

तुम्ही गेल्या दीड वर्षात सत्तेत राहून काय केले, हे सांगा की. कथित सिंचन घोट्याळ्यातील आरोपी, ज्यांना तुम्ही तुरुंगात पाठविणार होता, ते तुमच्या बाजूला बसले आहेत. शिंदे गटातील २५ ते ३० आमदारांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत, ते तुमच्या बाजूला बसले आहेत. जरा त्यांच्याविषयी बोला, मग भूतकाळातील घटनांवर चर्चा करा, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

एक भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवला होता. त्याच्या माध्यमातून तुम्ही हे (राष्ट्रपती राजवट) सर्व करून घेत होता. राजभवनाचा राजकीय आणि गुंडांचा अड्डा त्या काळी झाला होता. तुम्ही दुसऱ्यावर काय आरोप करता, असा सवालही राऊतांनी फडणवीसांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT