KDMC News : फेरीवाला मुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र तरीही काही फेरीवाले रेल्वे स्टेशन परिसरात आपले बस्तान कायम मांडून आहेत. त्यांना पालिका कर्मचारी, अधिकारी यांचा वरदहस्त असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे.
मात्र, आता कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. या कारवाईत अडथळा आणल्याचा ठपका ठेवत ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकप्रमुख अरुण जगताप यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा रंगली आहे.
पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील ग आणि फ प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांविरोधात मागील महिनाभरापासून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या देखरेखीखाली ही कारवाई होत असताना, ग प्रभागात मात्र पालिका पथके निघताच फेरीवाले पुन्हा बसत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. यामुळेच या भागातील कारवाईबाबत संशय निर्माण झाला.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेरीवाल्यांना पाठीशी घालण्यात पथकप्रमुख अरुण जगताप यांची भूमिका असल्याचा अहवाल आयुक्त अभिनव गोयल यांच्यापर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा जगताप यांना पदावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांची बदली घनकचरा विभागात करून त्यांना मूळ सफाई कामगार पदावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई गोपनीय पद्धतीने पार पाडली. ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आदेश निर्गमित केले असून, जगताप यांच्या जागी श्रावण पाटील यांची नव्या पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, फ प्रभागात मात्र फेरीवाला हटाव मोहीम काटेकोरपणे राबवली जात असल्याचे चित्र आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत पथके तैनात ठेवून एकही फेरीवाला बसू न देण्याची दक्षता घेतली जात आहे. याउलट ग प्रभागात वारंवार फेरीवाले दिसत असल्याने प्रशासनात नाराजी होती.जगताप यांच्याविरोधात यापूर्वीही फेरीवाल्यांशी जवळीक असल्याच्या तक्रारी होत्या. काही नगरसेवक व नागरिकांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने पडताळणी करून हा निर्णय घेतल्याचे समजते.
या कारवाईमागे राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बड्या लोकप्रतिनिधीचे जगताप यांना पाठबळ असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे जगताप घनकचरा विभागात प्रत्यक्ष हजर होतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फेरीवाला मुक्तीच्या दिशेने सुरू असलेल्या या मोहिमेत पुढे आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे इतर पथकांना देखील स्पष्ट संदेश गेला असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.