Babanrao Lonikar: शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. महिला आणि भगिनींना लाडकी बहीण योजनेतील पैसे देखील नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळत आहेत. तुझ्या मायचा पगार आणि बापाची पेन्शन आम्हीच दिली आहे, यांसह शेतकऱ्यांचा अत्यंत मुजोर शब्दात अवमान करणारे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर-यादव हे चांगलेच अडचणीत आले आहेत. अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी लोणीकरांनी माफी मागवी यासाठी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं. यानंतर अखेर लोणीकरांनी बुधवारी विधानपरिषदेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आपल्या या विधानावरुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
हरकतीच्या मुद्द्यावर बोलताना बबनराव लोणीकर-यादव म्हणाले, "काल आणि आज दोन दिवस सभागृहात माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे. चाळीस वर्षे मी राजकारणात आहे पण आयुष्यात मी जे कधी बोललोच नाही, ते मी शेतकरीविरोधी बोललो असं वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे. यामध्ये राजकारण आहे, मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी शेतकऱ्यांचे २५ हजार लोकांचे मोर्चे काढले आहेत, आंदोलनं केली आहेत. आणखी पुढची शंभर वर्षे माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. मी शेतकऱ्यांच्याविरोधात बोललेलो नाही"
"माझ्या मृत्यूनंतर माझी हाडं सुद्धा म्हणतील की, मी शेतकरी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्याच्या बाजूनं आहे. मी असं बोललेलो नाही, पण असं असलं तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर असं वाटतं असेल तर मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल. मला शेतकऱ्यांची माफी मागायला लाज वाटत नाही. पण मी यांची (विरोधकांची) माफी मागणार नाही, यांना राजकारण करायचं आहे. मी शेतकऱ्यांसाठी ४० वर्षे लढलो आणि २६ वर्षे शेतकऱ्यांनी मला निवडून दिलेलं आहे," असंही बबनराव लोणीकर-यादव यांनी सभागृहात म्हटलं आहे.
दरम्यान, लोणीकरांच्या या विधानावरुन शेतकरी नेते आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेनं लोणीकरांना फैलावर घेतलं आहे. बबनराव लोणीकर यांना भाजप आणि राज्य सरकार का वाचवतंय? असा प्रश्न त्यांनी केला. लोणीकरांना राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी म्हटलं की, शेतकरी हा काही भाजपचा घरगडी नाही. त्यामुळं लोणीकरांनी तातडीनं माफी मागून राजीनामा द्यावा. लोणीकरांना नाक घासून शेतकऱ्यांची माफी मागायला लावू. शेतकऱ्यांना कंगाल बनविण्याचं धोरण सध्याच्या सरकारनं राबविलं आहे. शेतकऱ्यांच्या सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात जीएसटी लागू करण्यात आला आहे. एकीकडं शेतकऱ्यांची लूट करायची आणि दुसरीकडं त्यांचा अपमान करायचा, असं दुहेरी शेतकरीविरोधी काम भाजप करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.