Walmik Karad Audio Clip Viral : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. वाल्मिकनं एका बौद्ध कुटुंबाकडं खंडणी मागताना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. तसंच वाल्मिकला मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक आरोप त्याच्या जवळच्या सहकाऱ्यानेच केला आहे. विजयसिंह बाळा बांगर असं वाल्मिकच्या सहकाऱ्याचं नाव असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबजनक खुलासे केले आहेत.
बाळा बांगर म्हणाले, वाल्मिक कराडनं काही कुटुंबांना त्रास दिला आहे. त्यानं माझे बौद्ध सामाजाचे मित्र आहेत त्यांना फोनवरुन जातीवाचक शिवीगाळ केली आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लीप मी समोर आणली आहे. वाल्मिक कराड समाजसेवक असल्याचं त्याच्या ज्या समर्थकांना वाटतंय त्यांनी देखील ही ऑडिओ क्लीप ऐकावी. अशा अनेक कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडं आहेत त्या आम्ही लवकरच शेअर करणार आहोत. या ऑडिओ क्लीपची पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणी देखील करावी. यासारखे अनेक कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. वाल्किम कराडची सत्यता लोकांना कळायला हवी.
सन २०२२, २०२३, २०२४ या काळात बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडसोबत काम केलं आहे. दोन अडीच वर्षे त्यांनी एका विचारानं काम केलं. पण नंतर त्यांच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली. वाल्मिक कराडविरोधात मतभेद व्हायचं कारण म्हणजे बांगर कुटुंबावरच नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यानं गुन्हे दाखल केले. पण त्यापूर्वीच २०२३-२४ मध्ये वाल्मिक कराड हा वेगवेगळ्या लोकांवर स्वतः पोलिसांकरवी गुन्हे दाखल करत होता. अशा कित्येक लोकांचा आपण जीव वाचवला आहे. त्यासाठी आपण वाल्मिकसोबत भांडलो. पण वाल्मिक कराड हा विकृती बनला होता. यातूनच आमच्यातील वाद विकोपाला गेला, असं बाळा बांगर यांनी सांगितलं आहे.
माझ्या ७० वर्षीय वडिलांवर आणि आईवर गोळीबार केल्याचे गुन्हे वाल्मिक कराडनं दाखल केले आहेत. याचं एकमेव कारण होतं की मी वाल्मिक कराडपुढं झुकावं आणि त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्याव. माझ्या शिक्षण संस्था त्यानं हडपण्याचा प्रयत्न केला, त्यावर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला. बांगर कुटुंबावर त्यानं ६ विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या कुटुंबाप्रमाणंच वाल्मिक कराडं अनेक कुटुंबांना अशाच प्रकारे त्रास दिला आहे. मी सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आलो आहे. माझ्याकडं वाल्मिक कराडच्या काळ्या कामांचा डेटा होता. हा डेटा मी उत्तर भारतात, दक्षिण भारतात ठेवला होता. बाहेच्या देशातही मी पुरावे ठेवले आहेत, असा दावाही बाळा बांगर यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू हाच आहे की, अनेक जण म्हणतात वाल्मिक कराड हा जातीयवादी नाही, समाजसेवक आहे. जर वाल्मिक समाजसेवक होता तर त्यानं खंडण्या का घेतल्या? त्याला जिल्ह्याचा गॉडफादर व्हायचं होतं, त्याला मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता. इतकंच नाही त्यालाच नंतर मंत्री व्हायचं होतं, असा खळबळजनक आरोपही विजयसिंह बाळा बांगर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.