Amit shah-Bharat Gogawale-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणारच नाही; शिवसेना नेत्याने कारणही सांगितले...

Ambadas Danve Big Statement : अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची जवळीक जास्त असू शकते. कारण ईडी, सीबीआयचा धाक दाखवून अमित शाह यांनीच शिंदे यांना फोडलं होते, त्यामुळे शिंदे यांना त्यांच्याशी जवळीक ठेवावीच लागेल.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 April : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये गेली तीन महिन्यांपासून धूसफूस सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्रिपदाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीत हा विषय त्यांच्या कानावर घेतल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर शिंदेंनी तातडीने रोजगार हमी योजना मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असेलले भरत गोगावले यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. मात्र, भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. रायगड जिल्ह्यात आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला पालकमंत्रिपद द्यावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी घोषणा केली आहे. मात्र, आंदोलने, मोर्चा निघाल्याने तटकरे यांच्या नियुक्ती स्थगिती दिलेली आहे.

पालकमंत्रिपदाच्या मुद्यावरून महायुती सरकारवर सत्तेवर आल्यापासून धूसफूस सुरू आहे. आताही अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला होता.

भरत गोगावले यांना पालकमंत्री न केल्यास रायगडमध्ये उठाव निश्चितपणे होणार आहे, त्यात काही चिंता करण्याची गरज नाही. मागच्या सरकारचे जे परिवर्तन झाले, ते रायगडमधून झालं. आम्ही छत्रपतींचे मावळे असल्याने हा अन्याय कधीही सहन करणार नाही, असा इशारा आमदार दळवी यांनी दिला होता.

अंबादास दानवे म्हणाले, अमित शाह यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे. त्याला फार महत्व देऊ नये. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून त्यांना बोलावले असेल. पण, रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मिळेल, असं मुळीच वाटत नाही. कारण एकनाथ शिंदे यांना आता भाजपवाले मोजतच नाहीत.

खाते वाटप, बदली प्रकरण, आर्थिक अधिकार याबाबत शिंदेंच्या खात्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांना आता फक्त हात चोळत बसावं लागतंय. उद्योग विभागाचा एमडी त्यांचं ऐकतसुद्धा नाही. तो काय करतो, हे उद्योगमंत्री उदय सामंत यांना माहितीसुद्धा नसतं.

परिवहन विभागाचंसुद्धा (एसटी) तसंच झालेले आहे. शिंदे यांच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांचं असं झालेले आहे, त्यामुळे मला वाटतं शिंदे काहीही करू शकणार नाहीत. तुम्ही अर्जंट बोलवा किंवा नाहीतर आरामशीर बोलवा. गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही, असा ठाम विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची जवळीक जास्त असू शकते. कारण ईडी, सीबीआयचा धाक दाखवून अमित शाह यांनीच एकनाथ शिंदे यांना फोडलं होते, त्यामुळे शिंदे यांना त्यांच्याशी जवळीक ठेवावीच लागेल, असा टोलाही अंबादास दानवे यांनी शिंदेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT