
Solapur, 13 April : मोहोळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर अवघ्या 15 दिवसांत आमदार झालेले राजू खरे नेमके कुणाचे असा प्रश्न पडावा, असे वर्तन गेल्या तीन महिन्यात त्यांच्याकडून होताना दिसून येत आहे. खरेंची निष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षावर आहे की पूर्वाश्रमीच्या शिवसेनेवर आहे, असा सवाल तीन महिन्यांच्या खरे यांच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. सांगोल्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कार्यक्रमाला मात्र दांडी मारली, त्यामुळे खरेंच्या दांडीची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे चार दिवसांपूर्वी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या सांगोल्याच्या दौऱ्यात शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत महायुतीचे जिल्ह्यातील नेते होते. मात्र, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘तुतारी’ वर निवडून आलेले राजू खरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सांगोल्यातील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याशिवाय, त्यांनी शिंदेंच्या स्वागताची जाहिरातही वर्तमान पत्रातून दिली होती, त्यामुळे पवारांच्या आमदाराची महायुतीच्या स्टेजवरील हजेरी हा चर्चेचा विषय ठरला होता.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावणारे आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमाला मात्र दांडी मारली होती. पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील आमदार उत्तम जानकर, अभिजीत पाटील आणि नारायण पाटील उपस्थित होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांत आमदारकी मिळवून देणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमाला राजू खरे यांनी दांडी मारली होती, त्यामुळे राजू खरे नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न पडावा, असंच त्यांचं वागणं असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
पंढरपुरातील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मी तुतारीवाला नुसता नावाला आहे. राज्यातील सत्तासुद्धा आपलीच आहे. ती सत्ता माझ्या माणसांसाठी निश्चितपणे येणार आहे, असे विधान केले होते. तसेच, सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलतानाही मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली. मी तुमच्यासोबत 35 वर्षे होतो, असे विधान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे राजू खरेंची निष्ठा पवारांच्या राष्ट्रवादीवर आहे की पूर्वाश्रमीच्या शिवसेनेवर आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.