Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : वेळेत न आलेला बडा नेता, विदर्भातील नेत्याचा सहीचा हट्ट अन् मंत्रालयात राहिलेली ती फाईल : अजितदादांनी बदलला गाडीचा प्लॅन

Ajit Pawar Death : रोहित पवार यांनी अजित पवारांचा बारामतीला विमानाने जाण्याचा निर्णय पूर्वनियोजित नव्हता, तर उशिरा झालेल्या राजकीय बैठका, फाईलवरील सही आणि चर्चांमुळे शेवटच्या क्षणी घेतला गेला, असा दावा केला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 February : अजित पवार हे बारामतीला विमानाने जाणार होते, हे पूर्वनियोजित होतं, असं अजिबात नव्हतं. आदल्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी गाडीने पुण्याला यायचं ठरलं होतं. पण, अजितदादांना भेटायला एक फार मोठा नेता येणार होता. पण, त्यांना यायला उशीर झाला. त्यांच्यातील चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या हट्टामुळे फायलीवर सही करायची होती. पण ती फाईल मंत्रालयात होती. ती देवगिरीवर आणेपर्यंत उशीरा झाला. तसेच, एका राजकीय कन्सल्टंटच्या चर्चेमुळे उशिरा झाला. त्यामुळे २७ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी दुसऱ्या दिवशी बारामतीला जाण्यासाठी विमान बुक करण्यात आले, असे गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केले.

अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरील सीसीटीव्ही पाहिलं, तर २७ जानेवारी रोजी संध्याकाळी दादांच्या गाड्या रांगेत लागल्या होत्या. दादांचा अंदाज होता की, साडेपाच ते सहापर्यंत आपण पुण्याला जायचं आणि पुण्यातून बारामतीला जायचं. मात्र, मुंबईतच उशीर झाल्यामुळे शेवटी विमानाने जायचं ठरलं, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नमूद केले.

ते म्हणाले, अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) अधिकाऱ्यांना म्हणाले होते की, चार ते पाच तास मी माझी कामे करेन. माझ्या पक्षाचे काही नेते, पदाधिकारी आणि कर्मचारी भेटणार आहेत. त्यानंतर मी पुण्याला जाईन, असा दादांचा अंदाज होता.

पुण्याला जाण्यासाठी अजितदादांचा ताफासुद्धा लागला होता. पण दादा निघाले नाहीत. कारण, एक फार मोठे नेते अजितदादांना भेटायला येणार होते. ते वेळेत येणार होते. पण, त्यांना यायला उशीर झाल्यामुळे आणि चर्चा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे अजितदादांचा वेळ गेला. त्यामुळे पाच ते साडेपाच वाजता पुण्याकडे गाडीने जाणारे दादा जाऊ शकले नाहीत. त्याकडे पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं. त्यामुळे ७ वाजून १३ मिनिटांनी दुसऱ्या दिवशीसाठीचे विमान बुक करण्यात आले होते, असे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, पूर्व विदर्भातील एक मोठे नेते आहेत. अजितदादांच्या मोबाईलची तपासणी करावी किंवा लॅंडलाईनवर कोणाचा फोन होता, काय होता? हे मला माहिती नाही. पण मला जे कळलं, त्यानुसार सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे. असा त्या नेत्याचा आग्रह होता. त्यामुळे ती फाईल कुठे आहे, हे जेव्हा बघितलं गेलं तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती फाईल दादांच्या मंत्रालयातील कार्यालयात होती.

अजितदादांनी ती फाईल मागवून घेतली. ती फाईल देवगिरीवर पोचेपर्यंत वेळ गेला. पण, आपल्या पक्षाचा एक मोठा नेता बोलत असेल तर सही करावी लागेल. त्यानुसार दादांनी त्या फाईलवर सही केली. पण त्यादरम्यान वेळ गेला, असे आमदार पवार यांनी नमूद केले.

एक राजकीय कन्सल्टंट आहे, त्यांचं शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं लागतंय, कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीच मिळत नाही. त्याचा काहीच फायदा होत नाही, अशी चर्चा त्या दिवशी होती. कारण सात दिवसांच्या आधी मी बारामती हॉस्टेलवर जेव्हा भेटलो, तेव्हा ‘शहाणपणा करू नका, आम्हाला राजकारण शिकवू नका. राजकारण कसं करायचं, हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही फक्त सर्व्हे करा,’ अशी चर्चा झाली होती. तशीच चर्चा मुंबईत झाली होती, त्या सर्वांमध्ये दादांना उशीर झाला आणि त्यांना गाडीने पुण्याला जायचा प्लॅन बदलावा लागला, असे रोहित पवारांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT