Nana Patole Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : भाजपला मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नाही; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Vijaykumar Dudhale

Mumbai News : भाजप सरकारनेच मराठा आरक्षणाचा विषय चिघळवला आहे. मुळात भाजप हा आरक्षण विरोधी पक्ष आहे, त्यामुळे आरक्षण द्यायचे नाही. भाजपचे सरकार गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात आहे, तरीही आरक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (BJP does not want to give reservation to Maratha community: Nana Patole alleges)

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर ५० टक्क्यांची मर्यादा उठवावी लागेल. केंद्र सरकारकडेच ते अधिकार आहेत. ही मर्यादा हटविण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकार घेताना दिसत नाही. भारतीय जनता पक्ष हा मराठा व धनगर समाजाला खोटी आश्वासन देऊन सत्तेत आलेला पक्ष आहे. पण, या दोन्ही समाजाला सरकारने आरक्षण दिलेले नाही, असेही पटोले यांनी नमूद केले.

पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणाचा कायदा विधानसभेत घाईघाईत करण्यात आला. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकलेला नाही. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो, असे म्हटले हेाते. पण, सत्तेत येऊन दीड वर्ष झाले तरी मराठा समाजाला अजूनही आरक्षण दिलेले नाही.

मराठा आरक्षणावर राज्यातील तिघाडी सरकारने आज पुन्हा बैठक घेऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने एक महिनाचा वेळ मागितला आहे. हा फक्त वेळकाढूपणा आहे. महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणाचे खापर फोडणे, हे हास्यास्पद आहे. कारण खुद्द फडणवीसांनीच ‘कोर्टात टिकणारे आरक्षण आम्ही दिले, असा दावा केला हेाता. मग, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण का टिकले नाही, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले की, केंद्र सरकारशी बोलून देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय नवव्या सूचीत का सामाविष्ठ केला नाही? भाजपाला मराठा समाजाला मुळात आरक्षण द्यायचे नाही, हे स्पष्ट होते. सरकारने आजही कोणता ठोस निर्णय घेतलेला नाही. समाजासाठी सरकारने कोणते निर्णय घेतले त्याची यादी वाचून दाखवली. मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, यावर शब्दही काढला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT