Mumbai News : भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. धस यांनी हे प्रकरण आपल्याला बायहार्ट लागल्यानं जोपर्यंत देशमुखांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. त्याचवेळी त्यांनी धाराशिवमधील नितीन बिक्कड यांनी सुरेश धस (Suresh Dhas) यांचे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळसोबतच्या कनेक्शनबाबत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या आरोपावर धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी (ता.6) राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळानं राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन राज्यपालांना पत्र दिलं.
तसेच यावेळी त्यांनी गुंड नीलेश घायवळसोबत कनेक्शन असल्याच्या आरोपावरही भाष्य केलं. पण यावेळी त्यांनी गुंड घायवळचा थेट 'साहेब' असा उल्लेख करण्यात आला. आपली ही चूक लक्षात येताच आणि त्यावरुन वाद पेटण्याच्या शक्यतेमुळे धस यांनी 'ऑनकॅमेरा सॉरी' म्हणून मोकळे झाले.
यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.तसेच जोपर्यंत या प्रकरणात चार्जशीट दाखल होत नाही,तोपर्यंत मुंडेंना मंत्रिपदावर ठेवू नये.किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्री करावं असंही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा विरुद्ध वंजारी असा वाद नाही.पण ज्यापध्दतीनं त्याला मारण्यात आलं, ते कुठंतरी मनाला आतमध्ये लागलं.म्हणूनच मी या लढाईत उतरलो आहे. यावेळी त्यांनी काही दीपक नागरगोजे यांच्यासह आणखी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी वंजारी असूनही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्यावर भल्यामोठ्या पोस्ट लिहित ढसाढसा रडल्याचंही सांगितलं.त्यामुळे या प्रकरणात मराठा असा वंजारी असा वाद नसून या प्रकरणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच भावना आपली असल्याचंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
यावेळी सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात परभणी येथे केलेल्या दादा, क्या हुआ तेरा वाद या वक्तव्यावरुनही दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, अजित पवारांसोबत मी जवळपास 10 वर्ष एकत्र काम केलं आहे.पण त्यांच्याविषयी बोलताना जर एकेरी उल्लेख झाला असेल तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असंही धस यांनी स्पष्ट केलं. माध्यमांना दिलेल्या अंदाजे नऊ मिनिटांच्या बाईटमध्ये अशाप्रकारे सुरेश धस यांंचा सॉरीनामा पाहायला मिळाला.
अजितदादांबरोबर मी खूप काळ काम केले आहे. एक नैतिक आदर म्हणून त्यांच्याविषयी अरे- तुरेचा शब्द जायला नको होता. जर गेला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. दादांना त्याचा राग येणार नाही. कारण अजितदादांसाठी मी डोक्यात दगडं खालली आहेत. त्या अधिकारवाणीने माझ्याकडून तेवढा शब्द गेला. गेला असला तरी तो माझा मी परत घेतो, असंही धस म्हणाले.
पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग हत्या प्रकरणी खळबळजनक विधान केलं होतं. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या 'सातपुडा' या शासकीय निवासस्थानावर खंडणीची बैठक झाल्याचा दावा करताना धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन बिक्कड यांचे नावही घेतले होते. याच बिक्कड यांनी धस यांच्यावर चौफेर टीका केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी ज्या प्रकरणामध्ये ते स्वत: असताना दुसऱ्यांची नाव का घेत आहेत. सर्वात मोठी खंडणी पाटोदा भागामध्ये कोणी-कोणी घेतली हे सगळ्या जनतेला माहिती आहे. सर्वात मोठा पवनचक्की माफिया कोण, कोण कुठे खंडणी घेतो? कोणाला मारहाण केली जाते याविषयी संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.
गुंड नीलेश घायवळ आणि सुरेश धस यांचे संबंध आहे हे धाराशिव आणि बीड जिल्ह्याला माहित आहे. पण आपला या खंडणी प्रकरणामध्ये कसलाही संबंध नाही. मी गावाकडे नसताना निलेश घायवळ याने चार गाड्या घेऊन येत माझ्या वडिलांना धमकी दिली होती. यानंतर वडिलांनी एनसी नोंदवली होती, पण गुन्हा नोंदवून घेतला नव्हता. तसेच मी जर त्या डीलिंगमध्ये असतो तर कंपनीनं नाव घेतलं असतं, असंही नितीन बिक्कड यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.