Kalyan News : कल्याण ग्रामीणमध्ये ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा राग मनात ठेवून पडले गावातील एका ग्रामस्थावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
विशेष म्हणजे जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिथे घुसून पुन्हा मारहाण करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिंदेच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे.
फिर्यादी कुटुंबाच्या आरोपानुसार, शिवसेना उपतालुका प्रमुख रोहिदास म्हात्रे हा आमदार राजेश मोरे यांच्या नावाचा वापर करून ग्रामीण भागात दहशत निर्माण करत असून, देसाई, शिळ आणि पडले गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता केवळ मारहाणीचे नव्हे तर राजकीय दबाव आणि स्थानिक दादागिरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथे बारशाच्या कार्यक्रमादरम्यान विनोद म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांच्यात वाद झाला. त्यावेळी बाबुराव पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती विनोद यांनी त्यांचे बंधू सुनील म्हात्रे यांना फोनद्वारे दिली. कार्यक्रम आटोपून सर्वजण गुरुवारी मध्यरात्री कल्याण-शिळ मार्गावरील पडले नाका परिसरातून परतत असताना पंढरीनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले.
सुनील पाटील यांनी मारहाणीबाबत जाब विचारताच त्यांच्यावर सुरा आणि पकडीसारख्या हत्यारांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत त्यांना कल्याण-शिळ मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. उपचार सुरू असतानाच बाबुराव पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख रोहिदास म्हात्रे, चेतन म्हात्रे, राम म्हात्रे, विकास आणि इतर काही जणांनी रुग्णालयात प्रवेश करून सुनील पाटील आणि त्यांचे बंधू विनोद पाटील यांना पुन्हा मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात विनोद पाटील यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणामागे ठाणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वैमनस्य कारणीभूत असल्याची चर्चा आता उघडपणे ग्रामीण भागात रंगू लागली आहे. पाटील कुटुंबीयांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याने शिंदेच्या शिवसेनेशी संबंधित अपक्ष उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याचाच राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पीडीत कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमधील वाद निवडणुकीनंतरही मिटलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत शिळ-डायघर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून आरोपींची संख्या १५ पर्यंत पोहोचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पडले नाका परिसरातील तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून तपासात ते महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत.
रस्त्यावर जीवघेणा हल्ला करूनही समाधान न मानता रुग्णालयात घुसून जखमींना मारहाण करण्यात आल्याच्या आरोपामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पाठबळामुळे आरोपींना संरक्षण मिळत असल्याचा आरोप जखमी सुनील पाटील यांनी केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी कुटुंबीयांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.