Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena Shinde Group : महायुतीतील भाजप-शिवसेनेत बेबनाव, अजित पवार गटाच्या 'या' नेत्याची कबुली

Pankaj Rodekar

Thane Political News : भाजप आमदारासह पदाधिकारी कल्याण लोकसभेवर दावा सांगत होते. हा वाद सोडवण्यासाठी वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. त्यातच आमदार गणपत गायकवाडांनी शिवेसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर थेट गोळीबारच केल्याने हा सुप्त वाद आता उफाळून आला आहे. यातच ठाण्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेला वादाची किनार असल्याचे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. तसेच हा वाद मिटवण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले.

भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेली गोळीबारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर महायुतीत भाजप-शिवसेनेत वाद असल्याचे अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी कबूल केले. ते म्हणाले, 'गोळीबाराची घटना निंदनीय आहे. या घटनेवरून बोध घेऊन, ठाणे जिल्ह्यातील महायुतीतील घटक पक्षातील अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा.'

परांजपे यांनी सांगितले, 'ठाणे जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना व भाजप यांच्यात अंतर्गत वाद असल्याचे गोळीबारातून समोर आले आहे. ठाण्यात भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडते. तर हाच प्रकार मिरा-भाईंदर, नवीमुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

'नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीनही जागा जिंकणे महत्वाचे आहे. अशावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी. त्यात महायुतीतील पक्षांतील तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,' असे मतही परांजपेंनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशभर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती कामाला लागलेली आहे. राज्यातही जागावाटपाची खल सुरू आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील तीन जागांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा संघर्ष थांबणार की तो असाच धुमसत राहणार, याची चर्चा जोरात सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT