Thane Political News : भाजप आमदार गणपत गायकवाडांनी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने राज्यात खळबळ उडाली. गोळीबार केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या काही गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. मात्र पोलिस ठाण्यात गोळीबार करण्याची वेळ का आली, असा प्रश्न आमदार गायकवाडांनी उपस्थित केला. त्यानुसार गोळीबाराच्या दोन दिवस आधी दोन्ही गायकवाडांमध्ये नेमके काय-काय घडले होते, घटनेवेळी पोलिस ठाण्यात काय स्थिती होती, याचा संपूर्ण घटनाक्रम 'सरकारनामा'कडे आहे.
31 जानेवारी - सकाळी 11 वाजता
आमदार गणपत गायकवाड द्वारली गावातील जाधव कुटुंबीयांच्या जमिनीवर कंपाऊंड टाकण्यासाठी गेले होते. यावेळी एकनाथ जाधव यांच्या घरातील महिलांनी आमदारांनी आमची जमीन हडपल्याचा आरोप केला होता. आमदार गायकवाडांनी आमच्या जमीनीचा एकही रुपया आम्हाला दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
महिलांनी केलेल्या आरोपांबाबत 'सरकारनामा'ने आमदार गायकवाडांची बाजू समजून घेतली. त्यावेळी त्यांनी संबंधित या महिला खोटे बोलत असल्याचे सांगत आरोपांचे खंडन केले होते.
1 फेब्रुवारी - सकाळी साधारण 11.30 वाजता
आदल्या दिवशी झालेल्या राड्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड यांनी काही रस्त्यांचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनात एका चर्चच्या रस्त्याचाही समावेश होता. त्यानंतर संबंधित चर्चच्या लोकांनी, आमच्या जागेतून हा रस्ता जात आहे. त्याबाबत महापालिकेने आम्हाला कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही, ती द्यायला हवी होती, असे सांगितले.
यावेळी आमदार गायकवाड आणि चर्चच्या काही नागरिकांत शब्दिक वाद झाला. त्यावेळी गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते चर्चच्या लोकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर चर्चच्या नागरिकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची 'सरकारनामा'ने विचारणा केल्यानंतर त्यास संबंधित पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली होती.
2 फेब्रुवारी - दुपारी 3 वाजता
आमदार गणपत गायकवाड यांच्या संबंधित असलेल्या एका बांधकाम व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड, राहुल पाटील, अक्षय गायकवाड, एकनाथ जाधव, सुनील जाधव यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
2 फेब्रुवारी - सायंकाळी 6 वाजता
गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन मालक जाधव कुटुंबीय महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्याकडे गेले. त्यानंतर महेश गायकवाड थेट हीललाईन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळी आमदार गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडही होते. यावेळी वैभव गायकवाडांना पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनबाहेरच अडवले होते. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आमदारांची एन्ट्री
पोलिस ठाण्यात घडलेल्या गोष्टींचा आढावा वैभव यांनी वडील गणपत गायकवाडांना (Ganpat Gaikwad) दिला. तोपर्यंत महेश गायकवाडांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यानंतर मुलाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे समजताच आमदार गायकवाडही कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात आले. आमदार आल्याचे समजताच पोलिसांनी त्यांनाही केबिनमध्ये महेश गायकवाड, राहुल पाटील आणि तक्रारदार बसले होते त्याच केबिनमध्ये गायकवाडांनाही बसवले.
बाहेर तणाव, आता गोळीबार
दरम्यान, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमुळे पोलिस ठाण्याबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप केबिनबाहेर गेले होते. याचवेळी आमदार गायकवाडांनी स्वसंरक्षणासाठी असलेली पिस्तूल काढून महेश गायकवाड यांच्यावर रोखली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
गोळीबाराचा आवाज येताच पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धावतच केबिनमध्ये आले. त्यांनी आमदारांना पकडून त्यांच्या हातातील पिस्तूलाचे ट्रिगर धरून ठेवले. परंतु तोपर्यंत महेश यांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांचा मित्र राहुल पाटील यांनाही गोळ्या लागल्या.
जखमी महेश गायकवाडांना पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी मिरा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविले. तर आमदार गायकवाडांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2 फेब्रुवारी - मध्यरात्र
आमदार गणपत गायकवाड रात्रभर पोलिस ठाण्यात बसून होते. तर महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर मध्यरात्री गोळ्या काढण्यासाठी ऑपरेशन करण्यात आले.
3 फेब्रुवारी - सकाळ 7 वाजता
आमदार गायकवाडांची मेडिकल टेस्ट करण्यासाठी त्यांना कळवा येथील मेडिकल ऑफिसमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कळवा पोलिस स्थानकात ठेवण्यात आले.
3 फेब्रुवारी - सकाळ 10 वाजता
महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते रात्रीपासून पोलिस ठाण्याबाहेर ठाण मांडून होते. सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज प्रसारित करा, अशी मागणी ते करत होते. इतकेच नव्हे तर ठाण्याहून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी देखील ही मागणी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांकडे देण्यात आले.
3 फेब्रुवारी - दुपारी 12 वाजता
आमदार गायकवाड यांना कळवा येथून उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, आमदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाचारण करण्याची मागणी आमदारांच्या वकिलांनी केली होती. ती मागणी कोर्टाने अमान्य केली होती.
3 फेब्रुवारी - साधारण सायंकाळी 5 वाजता
उल्हासनगर येथील चोपडा कोर्टात न्यायमूर्ती निकम यांनी आमदारांची बाजूही ऐकून घेतली. यावेळी आमदार गायकवाडांनी, माझ्या मुलाला या केसमध्ये होऊ नका. या गोळीबाराशी त्याचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वैभवला केसमध्ये अडकवण्याची हालचाल सुरू झाली असल्याचे न्यायमूर्तींना सांगितले. मीडियाशी देखील बोलायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना मीडियाशी बोलू दिले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
3 फेब्रुवारी - सायंकाळी 6 वाजता
आमदारांच्या वकिलांनी आमदारांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या संदर्भात कोणतीही माहिती आम्ही देऊ शकत नाही, असे मीडियाला सांगितले. मात्र त्यानंतर वकिलांनी सीसीटीव्ही फुटेज आरक्षित करा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली अशी माहिती समोर आली. आमदारांना घरच्या जेवणाचा डब्बा मागवण्यासाठी एक अर्ज केला होता. मात्र हा अर्ज देखील कोर्टाने फेटाळल्याचे बोलले जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.