नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली (Delhi) उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ठाकरेंच्या याचिकेवर निर्णय देऊ नये, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. (Caveat of Eknath Shinde in Delhi High Court)
कोणतीही सुनावणी आणि छाननी न करता निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविण्यात आले. तसेच, शिवसेना नाव वापरण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटाकडूनही कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर निर्णय देऊ नये, यासाठी शिंदे गटाकडून हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली ठाकरे-शिंदे वाद आता दिल्ली हायकोर्टात पोचला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यामध्ये शिंदे यांनीही ठाकरे यांच्या प्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली आहे. तिसरा पर्याय म्हणून गदा देण्यात आली आहे. नावातही शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव घेतले आहे, त्यामुळे कोणते नाव कुणाला मिळते, हे पाहावे लागेल.
एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचे ३ पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे, शिंदे यांनी निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी पहिले दोन पयार्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे या दोन्ही गटाला मिळण्याची शक्यता कमी आहे. उर्वरीत चिन्हे दोन्ही गटाला मिळू शकतात.
ठाकरे यांच्याकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. तर चिन्हांसाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ह्या चिन्हांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोणाला कोणते चिन्हे आणि नाव मिळते, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.