Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांनी अचानक गाठलं गाव,नाराजीच्या चर्चांना उधाण; सामंत,केसरकरांनी'सस्पेन्स'वाढवला

Shivsena Political News : एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात एकीकडे रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन पेटलेला वाद, मुख्यमंत्री पदावरील दाव्यावरुन तापलेलं राजकारण, मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींविषयी विरोधकांकडून वक्तव्यं यांसारख्या अनेक नाट्यमय व वेगवान घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे सोडून अचानक आपलं सातारा गाव गाठल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते 3 दिवसांच्या सुट्टीवर असल्याची माहिती आहे. मात्र, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळ गावी साताऱ्यातील दरे तांब येथे गेले आहेत. मात्र, त्यांच्या या सुट्टीची राज्यभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. तसेच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवरुन एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचंही बोललं जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या अचानक सुट्टीवर शिंदे गटातील नेते व मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. पण त्यात मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे.

यामुळे पुन्हा शिंदेंच्या सुट्टीमागील सस्पेन्स वाढला आहे. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही बोलले जात आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनीही एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे असा टोलाही यावेळी सामंतांनी लगावला.

रात्री 2 वाजता सलाईन लावावी लागते..

दरम्यान, मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सुट्टीवर भाष्य केलं. त्यावेळी केसरकर म्हणाले, सर्वात जास्त वेळ काम करणारा, सर्वांना भेटणारा आणि फक्त 4 तास झोपणारा मुख्यमंत्री आज राज्याला लाभला आहे. म्हणून त्यांच्या अवतीभवती सतत गर्दी असते. त्यामुळे मुंबई किंवा ठाण्यात राहून मुख्यमंत्र्यांना विश्रांती मिळत नाही. रात्री 2 वाजता त्यांना सलाईन लावावी लागते. यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री तयार नसले तरी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सक्तीच्या आणि तातडीच्या विश्रांतीसाठी साताऱ्याला त्यांच्या मूळ गावी नेले आहे. मात्र काही लोक यावरून वावड्या उठवत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या प्रकृतीवरून जर राजकारण होत असेल तर हे निषेधार्ह आहे. जनतेला माहिती आहे ते अशा अफवांना थारा देणार नाहीत असेही केसरकर यांनी मत व्यक्त केले.

शिंदेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी हे साताऱ्यातील दरे तांब या त्यांच्या मूळगावी पोहचल्यानंतर ग्रामस्थ, जिल्ह्यातील नागरिक यांनी शिंदे यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी शेतीची पाहणी केली. यावेळी आंबा, चिकू, नारळ आणि विविध जातीच्या फळबागांच्या झाडांची स्वतः तपासणी केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या घरातच प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर जनता दरबार भरवला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT