Shiv Sena News : Eknath Shinde :  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News : शिवसेनेच्या गळाला आणखी एक विद्यमान आमदार; शिंदेंकडून मोठं रिटर्न गिफ्ट...

Pankaj Rodekar

Mumbai News : राजस्थानमधील भरतपूर येथील बयाना विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी आज 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती धरत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Shiv Sena News)

या प्रसंगी आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच लहानपणापासून आपल्यावर हिंदुत्वाचे आणि लोकांना मदत करण्याचे संस्कार झाले आहेत. मात्र, याच विचारांवर आजची शिवसेना वाटचाल करत असल्याचे लक्षात आल्याने आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात आले असू,न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे येऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्यांना ठाऊक असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना समाधान वाटत असल्याचे बनावत यांनी मत व्यक्त केले.

"आपला मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. मात्र, तेथील मतदारांशी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळेच आपण निवडून येऊ शकलो, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पक्षाने सहकार्य केल्यास राजस्थानमध्ये शिवसेना अधिक भक्कम करू," अशी ग्वाहीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना या वेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "राजस्थानमधील ग्रामीण भागात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आमदाराने शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. त्यांचा मतदारसंघ ग्रामीण असल्याने त्यात मोठे काम करून दाखवण्याची संधी त्यांच्या हातात आहे. या संधीचा उपयोग त्यांनी स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तसेच या दुर्गम भागात नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी बयाना मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने पाच रुग्णवाहिका देण्यात येतील, असे या वेळी जाहीर केले. तसेच राजस्थानात शिवसेनेच्या (Shivsena) वाढीसाठी लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले.

या वेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना सचिव अभिजित अडसूळ, राजस्थानचे शिवसेना राज्य प्रमुख लखनसिंह पवार, शिवसेना सचिव सुशांत शेलार, उपनेत्या कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT