Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः त्यामध्ये सहभागी होतात. त्या प्रोजेक्टसाठी मुंबई महापालिकेच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात तब्बल 80 कोटी रुपयांची तरतूद आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला चालना मिळणार आहे. (Commissioner Chahal gave 80 crores for Chief Minister's 'Dream Project')
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘डीप क्लीन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते आणि पदपाथवरील धूळ कमी करणे हा उद्देश आहे. हवेची गुणवत्ता सुधारावी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यातील सर्वच शहरांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्री शिंदे हे मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी झाले होते. या मोहिमेत नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेली 10 आठवड्यांपासून म्हणजेच नोव्हेंबरपासून राज्यातील विविध शहरांत ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ ही मोहिम राबविली जात आहे. ज्या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह होतो, तिथे 10 पट जास्त माणसं लावून काम केलं जातं. मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थी, एनएनसी जवान आणि सामान्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू आहे.
डीप क्लीन ड्राईव्ह हा उपक्रम आगामी वर्षभर सुरू राहणार आहे, त्यासाठी अत्याधुनिक उपकरणं विकत घेतली जाणार आहेत, त्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात 80 कोटींची तरतूद केली आहे.
महिला सुरक्षा अभियानास 100 कोटी
मुंबईत महिला सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्याकरता विशेष ॲप तयार केले जाणार आहे. महिलांना थेट कंट्रोल रूमसोबत संवाद साधता येणार आहे. मुंबई पालिकेच्या सर्व वॅार्डमध्ये ही यंत्रणा पोलिसांच्या मदतीने काम करणार आहे, त्यासाठी 100 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
'बेस्ट'साठी 800 कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेच्या आर्थिक वर्ष 2024-25 अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य म्हणून 800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या 2000 इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या प्रवर्तन प्रकल्पाच्या 2573 कोटी इतक्या खर्चातील एकूण वर्धनक्षम तफावत निधीकरिता जागतिक बँक आणि राज्य शासनाकडून अनुक्रमे 70 टक्के व 25 टक्के इतकी रक्कम बेस्ट उपक्रमास देण्यात येणार आहे. उर्वरित 5 टक्के हिस्सा म्हणजे 128.65 कोटी रुपये इतकी रक्कम महापालिकेकडून देण्याबाबत राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.