Kokan News: कोकणातल्या राजकारणात कुरघोडी,आरोप-प्रत्यारोप, फोडाफोडीचं राजकारण नेहमीच पाहायला मिळते. त्यात कोकणात रायगड कायमच राजकीयदृष्ट्या हॉटस्पॉट ठरलेला दिसून येतो. रायगडमध्ये राज्याच्या गादीवर सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात पालकमंत्रिपदासह विविध मुद्द्यांवरुन याठिकाणी नेहमीच तीव्र संघर्ष पाहायला मिळतो. आता याच पार्श्वभूमीवर कोकणातून एक मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले किंवा भाजपनं दिलेला नसून थेट काँग्रेसने दिला आहे. खासदार तटकरेंचे भाचे असलेल्या अमोल महाडिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अमोल महाडिकांनी आपल्या समर्थकांसह शुक्रवारी(ता.31 जुलै) टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसचे सचिव आणि तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे हे उपस्थित होते. भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांचा काँग्रेस प्रवेश हा खासदार सुनील तटकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
अमोल महाडिक यांनी काँग्रेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने घरी आल्यासारखं वाटत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
राहुल गांधींचंच नेतृत्वच देशाला तारु शकणार आहे. म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच पक्ष जी जबाबदारी देईल ती समर्थपणे पार पाडणार असल्याचंही महाडिक यांनी स्पष्ट केलं.
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमोल महाडिक यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. ते म्हणाले, अमोल महाडिकांना काँग्रेस पक्षात प्रोफेशनल विभागात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होणार असल्याचं प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलून दाखवली.
याचदरम्यान, त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा लढा पुकारला असल्याचं म्हटलं. राहुल गांधी यांच्या देशपातळीवरील लढ्यात सहभागी होत त्यांचे हात बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत.
कॅप्टन अमोल महाडिक यांनीही तोच मार्ग निवडला असून देशाला खऱ्य़ा अर्थाने काँग्रेसचा विचार व राहुल गांधी यांचे नेतृत्वच तारू शकते हा विश्वास दृढ होत आहे. तसेच त्यांनी यावेळी हुकूमशाही प्रवृत्तींच्या हातून देश वाचवणं सर्वात महत्वाचं असल्याची भावना व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला देशभरातून पाठिंबा मिळत असून तरुण वर्गांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांच्या लढ्यात सहभागी होत त्यांचे हात बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.