Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले 'दादा' कोण ? पटोलेंनी ठिणगी टाकली

Former IPS Officer Meera Borwankar News : " भाजप आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर..."

Deepak Kulkarni

Mumbai News : येरवडा येथील पोलिस खात्याची तीन एकर जागा एका बिल्डरला देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांनी दबाव आणल्याचा खळबळजनक दावा अजित पवारांचे नाव न घेता त्यावेळच्या पुण्याच्या पोलिस आय़ुक्त आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर-चढ्ढा यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

त्यावर हे मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळले पाहिजेत, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात वादाची ठिणगी टाकली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते नाना पटोले(Nana Patole) यांनी सोमवारी मुंबईत मीडियाशी संंवाद साधला. त्यांनी धनगर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणाने प्रतिमा डागळलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक (डीजीपी) बनवण्याचा घाट भाजपच्या काही मंडळींनी घातला आहे, असा आरोप पटोलेंनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता केला.

एखाद्या अधिकाऱ्याने घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले, तर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी कसली देता? जर तुम्ही काही केलेले नाही, तर घाबरता कशाला? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) नाव न घेता केला.

लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि...

समृद्धी महामार्गावर नुकताच बारा जणांचा बळी घेणाऱ्या अपघातावर पटोले संतप्त दिसले, असे अपघात झाले की सरकार चौकशी करण्याची घोषणा करते, अशा किती चौकशा करणार? आणि याआधी घोषणा केलेल्या चौकशांचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या, असे ते म्हणाले. या महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहीत आहे. भाजपप्रणित शिंदे सरकारच्या काळात लोक घरात सुरक्षित नाहीत आणि बाहेर रस्त्यावरही सुरक्षित नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला..

आरक्षणासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक

राज्यात सध्या मराठा, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून, ती रास्तच आहे, असे पटोले म्हणाले. भाजपने २०१४ ला धनगर समाजाला आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले. केंद्रात व राज्यात सरकार असूनही ते अद्याप न देऊन या समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. हा प्रश्न मार्गी लावायचा असेल, तर जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल...

भाजपचा त्याला विरोध आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नावरून दोन समाजात वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे पाप भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, असा दावा त्यांनी केला.

ते मंत्री वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर ‘लंडन पर्यटन’...!

राज्यातील अनेक भागात कमी पाऊस झाला असून, त्यातही मारठवाड्यातील स्थिती खूप गंभीर आहे, शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे तेथे सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आहे पण सरकारला त्याचे काही गांभीर्य नाही. दोन-तीन कॅबिनेट मीटिंग झाल्या, पण त्यात दुष्काळावर चर्चा झाली नाही. या येड्याच्या (EDA)सरकारला जनतेचे काहीही देणे-घेणे नाही.

एक मंत्री सत्कार करून घेण्यात मग्न आहेत, तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर ‘लंडन पर्यटन’ करून आले व स्वतःचाच सत्कार करून घेत फिरत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला पटोलेंनी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT