Ajit Pawar, Baba Siddique Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Baba Siddique Shot Dead: सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वांद्रे पूर्वमधील निर्मलनगर परिसरातील शनिवारी (ता.12) घडली आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गृहखात्याकडून 'वाय' प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. पण तरीही ही घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर आरोपींनी दोन बंदुकीतून सहा राऊंड केले होते.त्यात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून ट्विटद्वारे प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी सोशल मीडियावरील X वर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला.

मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

'हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल...'

या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनीही ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.ते ट्विटमध्ये म्हणतात, बाबा सिद्धीकी यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडली. एक कर्तृत्ववान नेता आणि प्रिय सहकारी म्हणून त्यांनी पक्षासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी प्रस्थापित केलेले आदर्श कायम लक्षात राहतील.

बाबा सिद्धीकी अनेकांसाठी मार्गदर्शक होते, त्यांनी त्यांच्या दृष्टिकोन आणि समर्पणाने अनेकांना प्रेरित केले. दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकारतर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, याची ग्वाही देतो. या कठीण काळात त्यांच्या कुटुंब आणि प्रियजनांसाठी आमच्या मनःपूर्वक संवेदना प्रकट करतो असंही ते म्हणाले.

ही धोक्याची घंटा...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पवार म्हणतात,राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे.

गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे.बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

'गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी...'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाबा सिद्दीकी यांची हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले.

पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांचंही ट्विट...

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत बाबा सिद्दीकी यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. ज्येष्ठ सहकारी बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने अल्पसंख्याक चळवळीतील एक मोठे नेतृत्व गमावले आहे.

मी बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आम्ही सर्वजण सिद्दीकी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, ईश्वर त्यांना हे दुःख पेलवण्याचे सामर्थ्य प्रदान करो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT