Deepali Sayyed | Ashok Kharat | Maharashtra Epstein Files Sarkarnama
मुंबई

Deepali Sayyed : दिपाली सय्यद यांचा अशोक खरातबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'माझ्या ऑफिसमध्ये येऊन चिंचोके अन् ओश्नो जल...'

Deepali Sayyed on Ashok Kharat : दिपाली सय्यद यांनी सांगितलं की, "अशोक खरात याने त्यांना चिंचोके आणि पाणी दाखवलं होतं. तसेच काहीतरी पूजा करावी लागेल, असंही सांगितलं होतं. "आता मला वाटतं की ती गोष्ट मी तशीच सोडून दिली."

Jagdish Patil

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या चित्रपटाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावर आधारित या चित्रपटामुळे राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘कॅप्टन खरात यांनी मलाही ओश्नो जल आणि चिंचोके दिले होते,’ असं सय्यद यांनी सांगितलं आहे.

दिपाली सय्यद यांनी मुलाखतीत दोन वर्षांपूर्वी अशोक खरात मुंबईतील त्यांच्या कार्यालयात आल्याचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा त्याला भेटले होते, तेव्हा मला माहीतही नव्हतं की हा तो खरात आहे. दोन वर्षांपूर्वी तो काही कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या मुंबईतील ऑफिसमध्ये आला होता. त्याने सफारी घातली होती. त्यावेळी त्याने मला राजकीय सल्लाही दिला होता. 'बाई, तुझं काहीतरी चांगलं होईल. तुला काहीतरी पद मिळेल, तू मोठी होशील,' असं तो म्हणाला होता."

पुढे बोलताना सय्यद यांनी सांगितलं की, खरात याने त्यांना चिंचोके आणि पाणी दाखवलं होतं. तसेच काहीतरी पूजा करावी लागेल, असंही सांगितलं होतं. "आता मला वाटतं की ती गोष्ट मी तशीच सोडून दिली. जर अशा पद्धतीने माणसाला पदं मिळायला लागली, तर मग मेहनतच का करायची? एखादा माणूस गुरु म्हणून तुमच्याकडे येतो, तेव्हा आपण त्याला हडतूड करू शकत नाही. माझ्याही बाबतीत तेच झालं," असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या चित्रपटात अभिनेता मनोज जोशी कॅप्टन खरात यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात दिपाली सय्यद यांच्यासह सुबोध भावे आणि माधुरी पवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दुसरीकडे, या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आक्षेप घेतला आहे. आपली पूर्वपरवानगी न घेता चित्रपटात आपली व्यक्तिरेखा दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

नुकतीच रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या नावाची, फोटोची आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित बाबींची ट्रेडमार्क नोंदणी केल्याची माहिती दिली. "माझे नाव, माझा फोटो, ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही या गोष्टींचा व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्यास संबंधितांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच अशा प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर किंवा प्रमोशनल साहित्य तयार करून प्रसिद्ध केल्यास ते जप्त करण्याची मागणी करण्यात येईल आणि संबंधितांना फौजदारी तसेच दिवाणी कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही चाकणकर यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांविरोधात रुपाली चाकणकर नेमकी कोणती कायदेशीर पावलं उचलणार, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT