Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari, PM narendra Modi.
Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari, PM narendra Modi. Sarkarnama
मुंबई

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारच भाव खाऊन गेले!

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) विरूध्द भाजप असा जोरदार संघर्ष सुरू आहे. पुण्यासह मुंबई व इतर महापालिकांच्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी पुणे भाजपने (BJP) आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पुण्यात आणलं अन् मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केलं. पण त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधत भाव खाल्ला. तसेच यावेळी पवारांनी पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रस्तावित मेट्रो मार्गिका व इतर कामांसाठी मोदींना साकडंही घातलं.

एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी झालेल्या मुख्य कार्यक्रमात मोजकीच भाषणं झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं भाषण झालं. त्यावेळी उपस्थितांनी मोदी...मोदी...अशी जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्यानंतर अजित पवार भाषणाला आले अन् सर्वत्र शांतता पसरली. पवारांनी आपल्या भाषणात सुरूवातीलाच पंतप्रधान मोदींचे आभार मानले. पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद देत पवारांनी मेट्रोला लागलेल्या विलंबावरून विरोधी पक्षांना टोलाही लगावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर मेट्रो लवकर सुरू झाली, तशीच पुण्यासाठीही द्यावी, अशीही मागणीही पवार यांनी यावेळी केली.

राज्यपालांवर साधला निशाणा

भाषणाचा शेवट करताना मात्र अजित पवारांनी राज्यपालांचे नाव न घेता निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात पवार अन् कोश्यारी शेजारीच बसले होते. जी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याची त्यामागे पार्श्वभूमी होती. काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही. पण या महामानवांच्या कार्यांच्या उत्तुंग विचारांचा आदर्श आपल्या सर्वांना पुढे घेवून जायचे आहे, असं पवार म्हणाले.

राजकीय कलगीतुरा अन् वाद

पवारांनी थेट मोदींसमोरच राज्यपालांची तक्रार केल्यानं या कार्यक्रमात अजित पवारच सर्वाधिक भाव खाऊन गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सोशल मीडियातही त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपालांमधील सततचा कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. कधी पत्रांमधून तर कधी प्रसारमाध्यमांद्वारे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना राज्यपाल व आघाडीचे नेते दिसतात. विविध मुद्दांवरून वादही निर्माण झाले आहेत. अशातच अजितदादांनी थेट पंतप्रधानांसमोरच राज्यपालांवर नाव न घेता निशाणा साधल्याने त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दादांचे भाषण अन् मोदी...मोदी..गजर

राज्यपालांवर निशाणा साधल्यानंतर पवार भाषणाचा शेवट करत असतानाच उपस्थितांमधून मोदी...मोदी..चा गजर सुरू झाला. पंतप्रधान मोदी, फडणवीस, मोहोळ यांची नावे घेताच उपस्थितीत पुणेकर जल्लोष करत होते. इतरांबाबत मात्र व्यासपीठासमोर संपूर्ण शांतात पसरत होती. त्यावरूनही कार्यक्रमातील राजकीय कलगीतुरा समोर आला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतील भाजप विरूध्द राष्ट्रवादी या संघर्षपूर्ण लढतीची झलकच या कार्यक्रमात पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT