Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी सभागृहातील सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसत आपला अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचे त्यांनी थेट संकेतच दिले. मात्र, यावरूनच आता राजकारण तापलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित मलिकांना'महायुती'त घेण्यास नकार दिला.
फडणवीसांच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत."अजितदादा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना जात धर्मापेक्षा, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, हे तुम्ही दाखवून द्या", असे थेट चॅलेंज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी अजित पवारांना दिले आहे. याबाबत त्यांनी सविस्तार फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
या सर्व प्रकारानंतर अजित पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देत "नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे", तटकरेंनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले.
यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र, यावरच प्रशांत बाबर यांनी दिलेल्या आव्हानावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे देखील महत्वाचे असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आपण छत्रपती शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांपासून फारकत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने बाजूला झालात. आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्याचे माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक यांनीही आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. मलिक यांनी भाजप सरकारची, त्यांच्या काळ्या कृत्यांची कशी पोलखोल केली होती हे उभ्या महाराष्ट्राने, देशाने पाहिले. मलिक यांच्यावर सुडबुध्दीने गुन्हे दाखल झाल्याचे देशाने पाहिले. नवाब मलिक हे आज विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली.
त्यांनी तुम्हाला एक पत्र लिहून त्यांच्या भावनांची नोंद घ्यावी असा सल्ला दिला. हा सल्ला देताना त्यांनी सत्तपेक्षा देश महत्त्वाचे असे म्हटले. मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे ऐकून तुम्ही अस्वस्थ झाला असाल. अस्वस्थ झाला नसाल तर आपण कोणती विचाराधारा पुढे घेउन जात आहात हे उभा महाराष्ट्र बघणार आहे. भाजपचे खासदार, आमदार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचे उघड समर्थन करतात. हे समर्थन करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली. भाजपने त्यांना निवडून आणले.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आरोप आहे. हा खटला तर अजूनही सुरू आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप अद्याप सिध्द न झाल्यास अजितदादांनी त्यांचे स्वागत करावे, असा सल्ला फडणवीस तुम्हाला देत आहेत. मग साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर खटला सुरू असताना त्यांना कोणत्या आधारे उमेदवारी दिली. नथुराम गोडसेचे समर्थन करणारे लोकं आमदार, खासदारकी कशी भोगतात, असे प्रश्न अजितदादा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजेत. जात धर्मापेक्षा, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा हे तुम्ही दाखवून द्या, गोडसे समर्थकांची साथ आताच सोडा", असं प्रशांत बाबर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.