Mumbai, 12 May : ठाणे लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये बरेच रामायण घडले. भाजप आणि शिवसेनेत शेवटपर्यंत या मतदारसंघावरून रस्सीखेच होता. मात्र तो महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षानेच लढवावा, अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला.
ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha constituency) भाजपचे (BJP) चार आमदार आहेत. नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिका आमच्या हातात आहे. अशा परिस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपने लढवावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने बांधणी करण्याचे काम भाजपने केले. संजीव नाईक यांनीही कामाला सुरुवातही केली. पण ज्या दिवशी हा मतदारसंघ महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुटला, हे समजल्यानंतर शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे, असेही गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते म्हणाले, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर भागातील कार्यकर्ते नाराज झाले होते. संजीव नाईक यांना उमेदवारी मिळावी, अशी सर्वांची इच्छा होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या मनातही ठाणे लोकसभेची जागा ही भाजपनेच लढवावी, असे होते. पण ही जागा मिळावी; म्हणून भाजपच्या शिस्तीनुसार कोणी कोणाकडे वकिली केली नाही.
ज्या दिवशी ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेला सुटल्याचे जाहीर झाले, त्याचवेळी आम्ही संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांना सांगितले की कार्यकर्त्यांना आपल्याला विश्वासात घ्यावे लागेल. कारण कार्यकर्त्यांची मानसिकता ही वेगळी होती. माजी नगरसेवक, माजी उपममहापौर, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली होती. त्यात संदीप आणि संजीव नाईक यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि शेवटी मी समारोप करावं, असं ठरलं होतं, असे गणेश नाईकांनी नमूद केलं.
ते म्हणाले, त्या बैठकीत आम्ही समारोप करत होतो. पण काही लोक भावना व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यानंतर वातावरण बिघडत गेलं आणि मी सभागृह सोडलं. त्याचवेळी डोंबिवलीत देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांनी मला सांगितले की, उमेदवार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक मला भेटायला येत आहेत.
हाकलून दिल्याच्या बातम्या चुकीच्या
मी त्यांचं स्वागत केलं. पण, त्यांना शेजारी चाललेल्या मेळाव्यात काय घडतंय, हे कळतं होतं. त्यावेळी संदीप नाईक यांनी त्यांना सांगितले की, आपण पुन्हा भेटू. या वातावरणा तुम्हाला कार्यकर्त्यांसमोर नेणं बरोबर नाही. पण, त्यांना हाकलून लावलं, अशा बातम्या आल्या. त्या काही खऱ्या नव्हत्या, असेही स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.
फडणवीस आले अन् वातावरण बदललेले
बाहेरगावी गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नसेन. पण, देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतल्यानंतर वातावरण बदललं. आम्ही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे काम करत आहोत. फडणवीसांसमोर आमच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रात 45 पार करण्यासाठी नरेश म्हस्के निवडून येणे गरजेचे आहे, त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांना पटवून दिले. त्यानंतर कार्यकर्ते म्हस्केंच्या कामाला लागले, असा दावा नाईक यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.