Jalgaon News : पुण्यातील खराडी येथे फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हेही अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचप्रकरणात प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा धक्कादायक माहिती समोर आणल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुणे रेव्ह पार्टीवरुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय त्यामुळे रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उपदव्याप सरकारचे चालू असल्याचा हल्लाबोल केला आहे.
याचदरम्यान, माझ्या जावयानं जर असं केलं असेल, तर मला लाज वाटेल, तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो जर दोषी असेल तर त्याला फाशी देखील झाली, तरी मी त्याच्या समर्थनार्थ काही करणार नाही, असा नालायक प्रकार करणारा जावई मला नको अशी संतप्त भावनाही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.
एकनाथ खडसे म्हणाले, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, त्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे बोलत आहेत. विशेष म्हणजे त्या जी माहिती सांगत आहेत, वास्तविक पाहता ती पोलिसांनी सांगायला पाहिजे. रोहिणी खडसे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध कसे आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे, चाकणकर या चेकाळून बोलत असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आरोपी प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवरुन पलटवार केला. तसेच, एखादी खासगी माहिती ते अशाप्रकारे कशी सार्वजनिक करू शकतात, ती गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी करणे योग्य आहे, असेही खडसेंनी म्हटले.
रुपाली चाकणकरांचे आरोप हे राजकीय द्वेषातून असल्याची टीकाही एकनाथ खडसेंनी केली. ते म्हणाले, आपण आपल्या जावयाची बाजू घेणार नाही, दोषी असेल तर त्याला फाशी द्यायला हवी, हा मात्र बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. एकाही मुलीची त्याच्याविरोधात तक्रार नाही, खासगी आयुष्य आहे, एसआयटीपेक्षा केंद्राच्या एखाद्या तपास यंत्रणाद्वारे तपास केला जावा. सीबीआकडून या प्रकरणाचा तपासा करावा, अशी मागणीही खडसेंनी व्यक्त केली.
यापूर्वी एका बहुउद्देशीय संस्थेनं या प्रकरणी परप्रांतिय मुलींना बोलावण्यासह 28 वेळा हॉटेलचं बुकींग केल्याचा धक्कादायक आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर महिला आयोगानं पुणे पोलिसांना चौकशीचे निर्देश देत अहवाल मागवला होता.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवल्यानंतर त्यामधील धक्कादायक माहिती माध्यमांसमोर आणली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टी हे मोठं मानवी तस्करीचं रॅकेट असल्याचं सांगत खडसेंच्या जावयावर गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत.
आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे हाती लागल्याचा दावा केला होता. या पत्रकार परिषदेत खेवलकर यांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमधून 252 व्हिडीओ आणि 1749 नग्न तसेच अर्धनग्न फोटो जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये परराज्यातील मुलींवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचं समोर आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे मोलकरणीचे देखील फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याचं सांगितलं होतं.
चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणात वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर, मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. तसेच यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. “सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठे घोटाळे समोर येऊ शकते,” असा दावाही चाकणकर यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.