
Hingoli News: महायुतीतील मंत्री, आमदार नेतेमंडळी हे वादग्रस्त विधानं,हाणामारी, घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनी सातत्यानं वादात अडकले जात आहे. यात वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होत असल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच अखेरची संधी म्हणत यापुढे थेट कारवाईचा इशारा दिला होता. मात्र.यानंतरही महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लाडक्या आमदारानं थेट आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढत त्याला धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या आक्रमक स्टाईल आणि रोखठोक विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे.काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केलेल्या संतोष बांगर यांनी आता फोनवरुन एका आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढत त्याला सज्जड दम भरल्याचं दिसून आलं आहे.
शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) एका आरटीओ अधिकाऱ्याला झापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका शाळकरी रिक्षाला दंड आकारल्यामुळे आमदार बांगरांचा पारा चढला असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
आमदार संतोष बांगर यांनी ऑटो रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर आरटीओ अधिकार्यालाच फोन लावला. यावेळी त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली. यात त्यांनी संबंधित अधिकार्याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिल्यामुळे ते नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.
एका शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाचालकाला आरटीओ अधिकाऱ्यानं मोठ्या प्रमाणात दंड आकारला होता. याविषयी संबंधित ऑटोचालकानं आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आमदार बांगर आक्रमक झाले. त्यांनी त्याक्षणी आरटीओ अधिकार्याला फोन लावला अन् त्याला झाप झाप झापलं. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल, तर मी आरटीओ ऑफिस ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले संतोष बांगर कायमच वादग्रस्त राहिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बांगर यांची गाडी जरा अधिकच जोमात होती. अधिकाऱ्यांना धमकावणे, रुग्णालयातील पेशंटचे बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांना फोनवरून दम देणे, हॉस्टेलमध्ये जाऊन प्राचार्यांना कानफटवणे अशा अनेक प्रकरणातून आमदार संतोष बांगर गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले.
शिवसेनेचे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांची कळमनुरी ते हिंगोली औंढा नागनाथ पर्यंतची कावड यात्रा मराठवाड्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 2016 पासून सुरू झालेल्या या कावड यात्रेची राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चा होत असते. कधी कावड यात्रेत तलवार फिरवली म्हणून तर कधी आमदार संतोष बांगर यांनी 'बम भोले' म्हणत केलेल्या तांडव नृत्यावरून ते चर्चेत असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.