Shivtirth, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या विचारांची धग कायम ठेवणाऱ्या शिवतीर्थकडे वळली लाखो पावले !

Shivsena And Shivteerth : राज्याच्या राजकीय पटलावरील झंझावात 11 वर्षांपूर्वी शांत झाला

अय्यूब कादरी

Maharashtra Political News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन! बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांची पावले शिवतीर्थाकडे वळली आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला शक्तिस्थळ असे म्हटले जाते. त्या अर्थाने शुक्रवारी शिवतीर्थावर शक्तिपूजा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा हा दुसरा स्मृतिदिन आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थावर जाऊन अभिवादन करतील. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार, मंत्र्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले होते. यंदाही मुख्यमंत्री शिवतीर्थावर जाणार आहेत. (Latest Political News)

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय क्षेत्रातील झंझावात शांत झाला. मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मराठी माणूस हा शिवसेनेच्या केंद्रस्थानी होता.

शिवसेना मुंबईच्या बाहेर वाढणार नाही, ही भाकिते खोटी ठरवत बाळासाहेबांच्या करिष्म्यामुळे ती राज्यभरात पोहोचली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक साध्या माणसांना, उदरनिर्वाहासाठी छोटी छोटी काम करणाऱ्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. अशा लोकांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने सत्तेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

मुंबई आणि महाराष्ट्राची दूर्दशा झाली आहे, त्याला राजकारण कारणीभूत आहे. त्यामुळे तरुणांनी राजकारणापासून दूर राहावे, अशा आशयाचे आवाहन बाळासाहेबांनी शिवसेना स्थापनेनंतरच्या पहिल्या भाषणात केले होते. मराठी संस्कृती, मराठी भाषा, शिवरायांचा वारसा जपण्याची, तो समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. मराठी तरुणांनी हे आव्हान पेलले पाहिजे, अशीही साद त्यांनी घातली होती.

कालांतराने शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. सामान्यांना संधी दिली. सत्तेची सर्व पदे उपभोगून अनेकांनी शिवसेना सोडली. मात्र, शिवसेनेला त्याचा जास्त काळ फटका बसला नाही. शिवसेना पुन्हा उभारी घेत राहिली. ज्यांनी शिवसेना सोडली, त्या सर्वांना मात्र मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. यात छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.

शिवसेना आज प्रचंड संकटात आहे. पक्षाची दोन शकले झाली आहेत. शिवसेना सोडली की मतदार धडा शिकवतात, हा इतिहास आहे. त्यामुळेच आताच्या फुटीरांनी नियोजनबद्धरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केल्याचा आरोप लावला आहे. मतदारांच्या भीतीपोटी त्याचा सातत्याने पुनरुच्चार केला जात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला. त्याअर्थी उद्ध ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केला, हे फुटीरांचे म्हणणे मान्य करता येईल असे आहे. मात्र, त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये हे फुटीरही सहभागी होते. जनता हे विसरून जाईल, असे त्यांना वाटत आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पाऊस नसल्याने पुढील वर्षी उसाची जोपासना कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. राज्यकर्त्यांकडे या एकाही प्रश्नाचे उत्तर दिसत नाही. आरक्षण आंदोलने हाताळण्यातही सरकारला साफ अपयश आले आहे.

अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची उणीव भासत आहे. बाळासाहेबांच्या विचारांनीच आम्ही चालत आहोत, असे सत्ताधारी वारंवार सांगत आहेत. यातूनच शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे शिवसैनिकांची पावले बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर शक्तीपूजेसाठी वळली आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT