Kunal Kamra_Sushma Andhare 
मुंबई

Kunal Kamra: एकनाथ शिंदेंवरील विडंबनगीत प्रकरण: कुणाल कामरा, सुषमा अंधारेंची विधानभवनात हक्कभंग समितीसमोर हजेरी; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde parody song case : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनगीत सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नोटिशीप्रमाणे आज विधानपरिषदेत हजेरी लावली.

Amit Ujagare

Eknath Shinde parody song case : काही महिन्यांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनगीत सादर केलं होतं. यामुळं मोठा राडा झाला होता, ज्या स्टुडिओमध्ये हा शो पार पडला होता, त्या स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी केली होती. तसंच कुणाल कामरा याला फोनवरुन धमक्याही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, कामराची ही कृती म्हणजे आमदारांचा हक्कभंग असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याच्या हेतूनं विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीनं त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवून प्रत्यक्ष समितीसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार कामरानं आज विधानभवानत हजेरी लावली. त्याच्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील होत्या, त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. कारण त्यांनी कामराच्या कृतीचं समर्थन केलं होतं.

विधानभवनात काय घडलं?

दरम्यान, विधानभवनात विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीसमोर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांनी हजेरी लावली. पण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर हेच हजर नसल्यानं या दोघांचीही साक्ष होऊ शकली नाही. त्यामुळं याता याविषयावर पुढील सुनावणी १० मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. पण यावेळी विधानभवनाच्या आवारात पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी कामराला अडवल्यानंतर कामरा म्हणाला, "आज सुनावणी झाली नाही. सध्या मी मुंबईत सुरक्षित आहे. मी १० तारखेला परत येणार आहे तेव्हा समितीच्या लोकांसमोर आपली बाजू मांडणार आहेत माध्यमांना देखील त्याची माहिती देईल. मी बॅकफूटला तर जाणार नाहीच, पण यानंतरही स्टँडअप कॉमेडीचे शो करत राहणार आहे. मी संविधानाला मानणारा आहे त्यामुळं जेव्हा मला बोलावलं जाईल मी येईल. मी आज देखील आलो पण सुनावणी झाली नाही. जेव्हा आरोप माझ्यासमोर ठेवले जातील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. सत्ताधाऱ्यांना आपण विचारलेले प्रश्न जिव्हारी लागलेच पाहिजेत ना? का लागू नयेत?" असंही कामरा यावेळी म्हणाला.

दरम्यान, यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, "कुणाल कामरा आणि मी दोघेही समितीसमोर साक्ष नोंदवण्यासाठी आलो होतो. पण जे मूळ तक्रारदार आहेत प्रवीण दरेकर हे महाराष्ट्रात बाहेर दौऱ्यावर असल्यानं आज समितीसमोर येऊ शकले नाहीत. त्यामुळं मूळ साक्षीदाराची साक्ष नोंदवल्याशिवाय आमची साक्ष नोंदवता येत नाही. त्यामुळं दरेकर यांची साक्ष जोपर्यंत नोंदवली जाऊ शकत नाही तोपर्यंत पुढे काही होऊ शकत नाही. पण जर मूळ तक्रारदारच आज नव्हते तर त्यांनी आम्हाला तसं सांगायला हवं होतं आम्ही आलो नसतो. पण आजच्या सुनावणी काहीही झालं नाही. उलट आम्ही आलो म्हणून त्यांनी आम्हाला चहा दिला आणि निवांतपणे बसण्यास सांगण्यात आलं"

समितीचे प्रमुख काय म्हणाले?

विधानपरिषद हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले, "आज कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना हक्कभंग समितीच्या नोटीशीसंदर्भात बोलावण्यात आलं होतं. पण ज्यांनी हक्कभंग आणला आहे म्हणजे जे तक्रारदार आहेत ते आमदार गटनेते प्रवीण दरेकर आज साक्षीला येऊ शकले नाहीत. पण कायद्याच्या तरतुदीत या दोघांची साक्ष घेणं योग्य नव्हतं. पण कुणाल कामरानं सांगितलं की, आमची साक्ष घेतली तरी चालेल. पण नियमाला अनुसरुन ते चुकीचं होतं. त्यामुळं प्रवीण दरेकरांची साक्ष यांच्यासमोर आणि त्या दोघांची साक्ष दरेकरांसमोर घेण्यात यावी अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्यामुळं १० मार्च २०२६ रोजी दरेकरांशी चर्चा करुन वेळ निश्चित करण्यात आली आहे. आम्ही आगोदरची वेळही देत होतो पण संपूर्ण समितीनं असा निर्णय घेतला की, बाकीच्यांशी आपण चर्चा करावी. तसंच सुषमा अंधारे यांनी समितीला विनंती केली की त्यांच्या घरात लग्नकार्य आहे त्यामुळं या महिन्यात त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळं मग ही तारीख पुढे ढकलण्यात आली"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT