Shrikant Shinde, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : वारकऱ्यांच्या सेवेतून खासदार श्रीकांत शिंदेंचे होणार 'कल्याण' ?

Sunil Balasaheb Dhumal

भाग्यश्री प्रधान

Kalyan Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. ठाकरे गट या वादाचा फायदा उठवण्याच्या तयारीत आहे. अशा अटीतटीच्या वातावरणातून आपली जागा 'सेफ' करण्यासाठी शिंदे गटाने ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे पिता-पुत्रांनी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत वारकरी संप्रदायालाच आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कल्याण ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी या सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपस्थिती असणार आहे. तर त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वागताध्यक्ष म्हणून पद भूषवणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम शिंदे पिता-पुत्रासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार का, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, यापूर्वीही शिंदेंनी मतपेरणीसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे खासदार आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्यापुढे शिवसेना (ठाकरे गट), मनसे यांचे कडवे आव्हान असणार आहे. ते आव्हान पेलण्यासाठीच शिंदेंनी कल्याण ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाला पाठिंबा देत एक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले.

हा कार्यक्रम 2 ते 9 जानेवारीदरम्यान श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे गावात होणार आहे. उद्घाटनावेळी मलंगगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तसेच अश्व रिंगण होणार असून यासाठी थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये शिंदे पिता-पुत्रांची बालाजी भक्ती

2019 च्या निवडणुकीपूर्वीही डोंबिवली येथे दक्षिण भारतीयांची मतसंख्या लक्षात घेऊन तिरुपती श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी थेट उडपीहून 400 आचारी बोलवण्यात आले होते. तर तिरुपतीहून पुजारी बोलवण्यात आले होते. चक्क अडीच लाख लाडवांचा प्रसादही वाटण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार सुभाष भोईर यांनीही त्यांना मोठी मदत केली होती.

यंदा पंढरीकडे धाव

वारकरी संप्रदायाची मत लक्षात घेऊन अखंड हरिनाम सप्ताहावेळी वारकरी संप्रदायाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात आर्थिक हातभार लावल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांनी नियोजनात हातभार लावल्याचेही बोलले जात आहे. या संपूर्ण कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) स्वागताध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री शिंदेंची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे कल्याणसह राज्याचे लक्ष असणार आहे.

शिंदे फाउंडेशनतर्फे 24 तास सेवा

या किर्तन सोहळ्यासाठी दररोज तब्बल 25 हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे 24 तास विनामूल्य आरोग्य सेवा, रुग्णवाहिका सेवा आणि वाहन सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम शिंदे पिता-पुत्रासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार का, याची उत्सुकता लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT