Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Election Commission On NCP Crisis : ...अन्यथा शरद पवार गटाला अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्या लागणार!

Deepak Kulkarni

NCP Crisis News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याचा निकाल बुधवारी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बहुमताच्या आधारे हा निर्णय आयोगाने दिला आहे. अजित पवारांनी हा निर्णय नम्रपणे स्विकारत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. तसेच त्यांना उद्या ( ता.7) पर्यंत नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे. नाहीतर शरद पवार गटाला अपक्ष निवडणुका लढवाव्या लागणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेची जी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) देखील झाली आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत, त्यांना मूळ पक्ष देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. मात्र, आता या सगळ्याचे परिणाम आगामी निवडणुकांवरती होणार असल्याची चर्चा आहे.

2 जुलै 2023 मध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, आम्हाला हा निर्णय अपेक्षित होता असे शरद पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात निवडणुका आहेत. आता त्यासाठी शरद पवार गटाकडून विविध चिन्हांची चाचपणी देखील केली जात आहे. मात्र, जरी हा निकाल आज लागला असला तरी देखील नवीन चिन्हाची चाचपणी अजित पवार हे पक्षातून निघून गेल्यावर शरद पवारांनी शोधण्यास सुरुवात केली होती.

आमदार अपात्र निकाल पुढील आठवड्यात लागणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आता आमदार अपात्रतेचा निकाल देखील लगेच लागू शकतो.आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निकाल देण्याची शक्यता आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर नार्वेकर यांचा देखील निर्णय तोच असणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT