Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Finance Ministry : अजितदादांची प्रत्येक फाईल व्हाया फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे जाणार..?

शिवसेनेच्या विरोधानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने अर्थ आणि नियोजन विभाग दिला.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या १२ दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर मार्गी लागले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या विरोधानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने अर्थ आणि नियोजन विभाग दिला. शिंदे गटाची नाराजी पत्करली असली तरी अर्थखात्याची प्रत्येक फाईल ही अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांकडे जाताना ती देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Every file of Ajit Dada's finance department will go to Chief Minister Via Fadnavis)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत आठ आमदारांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेतली हेाती. तेव्हापासून खातेवाटप रखडलेले होते. मंत्रिपदावरून गेल्या बारा दिवसांपासून तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये काथ्याकूट सुरू होता. अगदी मध्यरात्री साडेतीनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यात बैठका चालल्या होत्या. मात्र, त्यावर तोडगा निघत नव्हता.

अजित पवार हे अर्थ खात्यावर ठाम होते, त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रातून निरोप येताच पवार यांना अर्थ आणि नियोजन मंत्रिपद देण्यावर मतैक्य झाले. त्यानुसार आजअखेर खातेवाटप झाले आहे. त्यात शहा यांच्या सूचनेनुसार अजितदादांना अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गट अस्वस्थ असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवाय सहकार, कृषी, औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण आणि मदत व पुनर्वसन अशी महत्वाची खाती आली आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, अर्थखाते हे सर्वात की ठरण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अजितदादांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या बहुतांश आमदार आणि मंत्र्यांचा विरोध होता. त्या एकमेव विभागावरून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र, अमित शहांच्या मध्यस्थीनंतर अर्थमंत्रीपद अजित पवारांना मिळाले आहे. मात्र, ते देताना अर्थ विभागाची प्रत्येक फाईल अजित पवारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच जाईल, असे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT