MumbaI News : राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचार तोफा नुकत्याच थंडावल्या. या प्रचारात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिग्गज नेत्यांची फौज उतरवली होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे. शिंदे हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राजस्थान दौऱ्यावर गेले होते. या वेळी विशाल रॅली काढण्यात आली होती. यानंतर आता ते तेलंगणातही प्रचारासाठी गेले आहेत.
यावरूनच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर खोचक टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही टीकेची झोड उठवली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या संकटावर भाष्य करतानाच महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत.
बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहेत. शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे, अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असा हल्लाबोल करतानाच एक फुल प्रचारात आहे, मग दोन हाफ कुठे गेलेत, असा खोचक सवालही ठाकरेंनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सरकार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात मग्न आहेत. मोदी महाराष्ट्रात येत का नाहीत? शेतकऱ्यांकडे बघतही नाहीत. राज्यात काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पण त्यावर काय केलं? मुंबईत पाण्याचा नाश करत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं या सरकारचा तेरावा महिना असल्याचा घणाघात त्यांनी केला.
गद्दारांचे पुनर्वसन कसं करायचं, यावरच त्यांचे लक्ष आहे. जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय, असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, अशी टीकाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केली.
...मग आमच्या राज्यात कधी घोषणा करणार?
कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जर पीकविमा रक्कम दिली गेली नाही, तर मी दिवाळी साजरी करणार नाही, मग त्याचं काय झालं असा सवालही मुंडेंना केला. शेतकरी बिचारा रात्रीबेरात्री वीज नाही म्हणून शेतात पाणी द्यायला जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आपली सत्ता वाचवायला जातात. भाजपचे रेवडीवाले इतर राज्यांच्या निवडणुकांत रेवड्या उडवत राहतात, मग आमच्या राज्यात कधी घोषणा करणार, असा खडा सवाल करत सरकारला धारेवर धरले.
निफाड येथील शेतकऱ्यांनी पाहणीला आलेल्या पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार दिलीप बनकर यांना दौरे खूप झाले, ठोस काय करणार, भरीव मदत देणार असाल तर बोला, अन्यथा तुम्हाला दुरूनच राम राम या शब्दात सुनावले. याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला टोला लगावला.
ते म्हणाले, पावसाने मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचं नुकसान झालं आहे. सरकारमुळे कांद्याचे शेतकरी रडकुंडीला आले होते. यंदा महाराष्ट्रात दुष्काळही आहे आणि आता अवकाळी आहे, त्यामुळे राज्यावरचं संकट काही कमी होत नाही. एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला, तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला या नाहीतर निघून जा, असे ठाकरे म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.