Nitesh Rane: सातत्यानं संविधानविरोधी विधानांसाठी ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांचा सरकारनंच करेक्ट कार्यक्रम केल्याची सध्या चर्चा आहे. कारण मुस्लिमांविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवलं असून अल्पसंख्यांक विभागाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. या नोटिशीला आता नितेश राणेंना उत्तर द्यावं लागणार आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नितेश राणे यांची मुस्लिमांबाबतची विधानं ही गांभीर्यतेनं घेता कामा नये. मुस्लिमांच्या बहिष्काराची त्यांनी भाषा केली आहे, आपण पाहिलंत तर गेल्या ७० वर्षांपासून मुस्लिमांचा बहिष्कारच होत आला आहे. खरंतर त्यांचा बहिष्कार करण्यासारखी कुठली गोष्टच नाही. त्यांचा तुम्ही बहिष्कार काय करणार आहात? त्यांची पंक्चरची दुकानं, चहाच्या हॉटेल्सचा, पानाच्या टपऱ्यांचा, भाज्यांच्या दुकानांचा? कशाचा बहिष्कार तुम्ही करणार आहात. मागच्या सरकारांनी आधीच मुस्लिमांवर खूप बहिष्कार टाकले होते."
"आता कुंभमेळ्यात जे लोक येणार आहेत ते आस्थेची डुबकी घ्यायला येणार आहेत. त्यामुळं अशा प्रकारे द्वेषपूर्ण भाषा वापरुन आपण या भाविकांच्या पुजाअर्चेत आपल्याला विघ्न आणायचा नाही. हा देश एक असा देश आहे जिथं सर्वांना मिळून-मिसळून राहायचं आहे. मुस्लिमांबाबत समाजात खूप अफवा पसरवल्या जात आहेत. लोक चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओज बनवून आपलं राजकारण धगधगत ठेवू इच्छितात, त्यामुळं ही एकदच चुकीची गोष्ट आहे"
अल्पसंख्यांक आयोगाची याबाबतची भूमिका मांडताना प्यारे खान म्हणतात, "नोटिस पाठवून नितेश राणेंकडून खुलासा मागितला जाणार आहे. नितेश राणे जे बोलतात ती भाजपची विचारधारा नाही तर त्यांचं वैयक्तिक विधान आहे. भाजपत अशा गोष्टींसाठी जागा नाही. त्यामुळं अल्पंसंख्यांक आयोगाकडून याची निश्चितपणे दखल घेतली जाईल. जर अशा प्रकारे धर्मांमध्ये कोणी तेढ निर्माण करत असेल तर यावेळी त्यांना याचा जाब विचारला जाईल. यासाठी त्यांना नोटीस पाठवून विचारलं जाईल, की तुम्ही वारंवार अशा प्रकारे द्वेषाची भाषा करत आहात त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासामध्ये बाधा येत आहे.
कारण इथले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वात मोठ्या सनातनींपैकी एक आहेत. या देशात कुठल्याही सनातनी व्यक्तीनं अशा प्रकारे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण होण्याची भाषा केलेली नाही. यामध्ये मोहन भागवत, नितीन गडकरी घ्या किंवा देवेंद्र फडणवीसांना घ्या, हे कधीही अशा प्रकारची भाषा करत नाहीत. ते देशाला जोडण्याची, देशाला घडवण्याची देशाच्या विकासाची बात करतात. त्यामुळं अशा प्रकारच्या भाषेला महाराष्ट्रात कुठलाही थारा नाही"
दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना आमदार नितेश राणे यांनी कुंभमेळाव्याबाबत भाष्य करताना म्हटलं की, "कुंभमेळा जेव्हा सुरु होईल तेव्हा तिथं फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत अशी माझी मागणी आहे. कशाला पाहिजेत तिथं गोल-टोपी दाढीवाले. मग हा हिंदुचा सर्वात मोठा महाकुंभ आहे तर तिथं सगळी हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत. आम्ही मशिदीबाहेर काही विकायला जातो का? त्यामुळं महाकुंभच्या भागातही ते फिरकताही कामा नयेत. मग तिथंही ते नाव बदलून येणार, दुकानावर जयश्रीराम फुलवाले लिहिणार आणि आत अब्दुल बसला असणार"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.