

माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी स्पष्ट अट घातली होती की आगामी विधानसभा निवडणुकीत यशवंत माने हेच उमेदवार असले पाहिजेत.
राजन पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कमळ चिन्ह घराघरात पोहोचवण्याचे आवाहन करत उमेश पाटील व राजू खरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
ते म्हणाले की, तालुक्यातील काही नवीन नेते द्वेष पसरवत आहेत, मात्र मतदारांनी विकासाच्या मार्गावर राहून महायुतीला बळ द्यावे.
Solapur, 08 November : आगामी विधानसभा निवडणुकीत यशवंत माने हेच उमेदवार असले पाहिजेत, अशी अट भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना घातली होती. मानेंचं उमेदवारीचं ठरल्यानंतरच आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मोहोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील बोलत होते. त्या वेळी त्यांनी भाजप प्रवेशासाठी यशवंत मानेंच्या उमेदवारीची अट घातली होती, हे जाहीर सभेतून स्पष्टपणे सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत मोहोळ तालुक्यात कमळावरच आमचा उमेदवार उभा असणार आहे, हेही राजन पाटील (Rajan Patil) यांनी स्पष्ट केले.
यशवंत माने (Yashwant Mane) जरी आमदार नसले तरी आता ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कागदावर सही केली, मी जुना आमदार असूनही माझ्या कागदावर सही केलीच नाही, त्यामुळे यशवंत माने काम करणारा माणूस आहे, असेही राजन पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, भाजप नेत्यांनाही खात्री नव्हती की, यशवंत माने भाजपमध्ये येतील. सोलापूर जिल्ह्यातही चर्चा होती, ते भाजपमध्ये जाणार नाहीत. मात्र, प्रवेशावेळी दिसले, त्यावेळी म्हणणाऱ्यांनी श्वास सोडला.
मोहोळ तालुक्यातील आमचा पारंपारिक विरोधक आहे. मला विरोध करतो. मात्र, घरापर्यंत कधीच आला नाही. आजकाल जे दोन-चार जणांचं नवीन टोळके निघालं आहे. त्यांना तालुक्याचा नेता व्हायचं आहे. तालुक्याचा नेता होण्याची मनीषा बाळगून नेता होतं येत नसतं, तर लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करून नेता होता येतं, अशी टीका माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता केली.
राजन पाटील म्हणाले, आमचे विरोधक संस्कृत होते, पण आता नवीनच दोन-चार जित्राबं आली आहेत. पुढच्या पिढीसाठी ही प्रवृत्ती चांगली नाही. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर तो अधिकार मतदारांना आहे आणि तो अधिकार तुम्ही वापरला पाहिजे. तालुक्यात जे काही असली माणसं आहेत, ते द्वेषाने पछाडलेली आहेत, त्यांना बाकी काहीही देणंघेणं नाही. त्यांच्याकडून गाव पेटवण्याचं काम होतं आहे, त्यामुळे आता आपल्याला भाजपचं कमळ चिन्ह घरांपर्यंत पोहोचवायचं आहे. महायुतीनी जी प्रगती केली, ती घरापर्यंत पोहोचवायची आहे.
म्हणून उमेश पाटलांना डीपीडीसीवरही पाठवले
एका बाजूला यशवंत मानेंसारखी माणसं, तर दुसऱ्या बाजूला घरदार आमच्या पाया पडून सत्ता आमच्याकडून घेतली आणि आमच्यावरच ॲक्शन करत खिल्ली उडवली. त्यांना मी तिकीट दिलं होतं, पक्षानं तिकीट दिलं नव्हतं (उमेश पाटलांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकिटाची करून दिली आठवण.) मला सर्व जिल्हा सांगत होता, डीपीडीसीला त्यांचं नाव देऊ नका, विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटलांचं नाव द्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं बाळराजे मितभाषी आहेत. उमेश पाटील बोलून आपल्या तालुक्याला निधी खेचून आणेल, म्हणूनकरता द्या म्हणलो. निधी खेचायचं लांबच राहिलं आणि माझ्यावरच... हाताची ॲक्शन करत राजन पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
राजू खरेंना टोला
मोहोळ तालुक्याला एक रुपयाचा निधी नाही. पाणी आम्ही आणलं आहे. इथे बसून मागण्या करणं सोपं आहे. हे अमलात आणण्यासाठी किती काम आणि कष्ट करावे लागतं, हे ज्याचं त्याला माहीत असतं. मोहोळ तालुक्यात एका वर्षात एक रुपयाचाही निधी आला नाही. हे सांगतील सरकार विरोधकांचा आहे. पण सरकार सोबत यांचे रोजच फोटो असतात, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांना टोला लगावला
Q1. राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कोणती अट घातली होती?
A1. त्यांनी अट घातली की विधानसभा निवडणुकीत यशवंत माने हेच उमेदवार असावेत.
Q2. राजन पाटील यांनी कोणावर अप्रत्यक्ष टीका केली?
A2. त्यांनी उमेश पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Q3. पाटील यांनी कार्यकर्त्यांना कोणते आवाहन केले?
A3. कमळ चिन्ह आणि महायुतीची प्रगती घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले.
Q4. मोहोळ तालुक्यातील विकासाबाबत पाटील काय म्हणाले?
A4. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात तालुक्यात एक रुपयाचाही निधी आला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.