C R Patil On Chhatrapati Shivaji Maharaj  Sarkarnama
मुंबई

BJP Controversial News: निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान; म्हणाले,'छत्रपती शिवाजी महाराज हे...'

Chhatrapati Shivaji Maharaj controversy: राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार जोमात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरात भाजपचे प्रमुख नेते असलेल्या सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत हा मुद्दा विरोधकांना सत्ताधारी भाजपसह महायुतीला घेरण्याची आयती संधीचं मिळाली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्यातील महापालिका निवडणुकीतील प्रचार मतदानाची तारीख जवळ जवळ येत असतानाच आरोप-प्रत्यारोपांनी अधिकाधिक टोकदार होत चालला आहे.एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी-अमराठीचा मुद्दा पेटला असतानाच दुसरीकडे केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपामधील मोठं नाव असलेल्या नेत्यानं छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते सी.आर.पाटील यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते', असं विधान केलं आहे. या त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं असून राजकीय पक्षांसह इतिहास व शिवप्रेमी संघटनांकडून आक्रमक प्रतिसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात भाजपच्या सी.आर.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य केलं.

राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार जोमात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरात भाजपचे (BJP) प्रमुख नेते असलेल्या सी.आर. पाटील यांनी केलेल्या विधानामुळे मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत हा मुद्दा विरोधकांना सत्ताधारी भाजपसह महायुतीला घेरण्याची आयती संधीचं मिळाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती दाखवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सी.आर पाटील यांचं नेमकं विधान काय…?

केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपामधील मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या सीआर पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते त्याचा मला आनंद आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा यशस्वी प्रयत्न केला, असंही त्यांनी सुरत येथील एका पाटीदार समाजाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी म्हटलं.

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपण सी.आर पाटील यांचे भाषण ऐकल्याचं सांगितलं. ते म्हणाले, सी आर पाटलांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजराती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे आणि मराठा साम्राज्याचे राजे आहेत. हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी यावेळी केला.

तसेच भारतीय जनता पार्टीनं आत्तापर्यंत अनेक युगपुरुष पळवायचा प्रयत्न केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला. ते म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस,सरदार वल्लभभाई पटेल,रवींद्रनाथ टागोर यांना पळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. आता अखेर भाजपनं आता छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनीही सी आर पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले. भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा नेता असं वक्तव्य करत असेल तर हे निषेधार्थच आहे. 'मुळातच छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर त्यांना महाराष्ट्रात येऊन गडकोट फिरावे लागतील आणि मग ते कोणत्या समाजाचे होते, काय समाजाचे होते ते बोलावं. महाराजांचा इतिहास आयुष्यात आत्मसात करायचा नाही, त्यांच्यासारखं काम करायचं नाही हा या लोकांचा कुचकामीपणा असल्याचा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला.

तर इतिहास अभ्यास संजय सोनवणी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या समाज, जात आणि धर्माचे होते असा विचार करण्याचा मूर्खपणाच आहे. शिवाजी महाराज सर्वांचे होते. मात्र, इतिहास सांगतो की ते मराठा होते. त्यांनी अनेक पत्रांमध्ये तसा उल्लेख असल्याचा दावाही सोनवणी यांनी यावेळी केला. तसेच या मंडळींनी इतिहासाचं वाचन करण्याची गरज आहे. नाहीतर महापुरुषांबद्दल अशी बेधडक वक्तव्य करण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं,असंही सोनवणी यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT