Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना जयंत पाटलांनी व्यक्त केली 'ही' भीती; ‘चंदीगडप्रमाणे...’

Lok Sabha Election Result 2024 : काही मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना पुन्हा 300 जागा मिळणार, असे चित्र काही यंत्रणांच्या माध्यमातून रंगवले जात आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक असून मतमोजणीच्या अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 03 June : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार, कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्यात ‘एक्झिट पोल’च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्यामुळे ही दिशाभूल केली जात आहे. तुम्हाला गाफील ठेवून चंदिगडप्रमाणे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतमोजणीत फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीत सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कुठलीही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तुम्ही सावध आणि सतर्क राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

मतदानोत्तर कलचाचण्यांनी अनेकांची धडधड वाढली असून अनेक उमेदवारांना गोंधळात टाकले आहे. प्रत्यक्षात मतमोजणी उद्या सकाळी आठपासून सुरू होणार आहे. मतदानोत्तर कलचाचण्यांनंतर महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही पक्षाचे लोकसभेचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याची सूचना केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election) तुम्ही घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. पण आपली लढाई अजून संपलेली नाही. मतदानाच्या विविध टप्प्याच्या वेळी तुम्ही सर्वांनी जो संयम आणि दक्षता बाळगली. तीच दक्षता व सतर्कता मतमोजणी संपून विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्या सर्वांना बाळगायची आहे. सत्ताधारी पक्षाकडून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु तुम्ही दक्ष राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केला आहे.

सत्ताधाऱ्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून आपला स्वार्थ साधायला सुरुवात केली आहे. काही मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना पुन्हा ३०० जागा मिळणार, असे चित्र काही यंत्रणांच्या माध्यमातून रंगवले जात आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक असून मतमोजणीच्या अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. इंडिया आघाडीला देशात स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे लक्षात आल्याने सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, तुम्हाला संभ्रमात टाकून, तुम्ही दक्ष नाहीत, हे हेरून चंदीगढप्रमाणेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहावे. सत्ताधाऱ्यांच्या 'एक्झिट पोल' प्रोपगंडाला बळी पडून स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका. मतमोजणी पारदर्शक आणि नियमानुसार कशी होईल, याची खबरदारी घ्यावी.

प्रत्येक विधानसभा विभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नमुना म्हणून निवडलेल्या पाच मतदान केंद्रांच्या VVPAT चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ती पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रातून तुम्ही बाहेर पडू नका. मतमोजणीचा ४ जून हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मतमोजणी होईपर्यंत प्रत्येक प्रक्रियेत सजग राहावं, अशीही सूचना जयंत पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT