Sambhaji Raje - Tuljabhavani Gold Jewellery  Sarkarnama
मुंबई

Tuljabhavani Jewellery News: तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ, संभाजीराजेंचा आंदोलन उभारण्याचा इशारा !

संभाजी थोरात

Kolhapur News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालापासून अर्पण करण्यात आलेले दागिन्यांपैकी अनेक दागिने गायब झाल्याची धक्कादायका माहिती समोर आली होती. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राजे आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

संभाजीराजे यांनी श्री तुळजापूर देवस्थानचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून याबाबत तपास करावा, असा आग्रह धरला. या तपासात बेजबाबदारपणा दाखवल्यास राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि संभाजीराजेंचे पुढचे पाऊल काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांपासून, छत्रपती घराण्यातील वंशजांनी दागिने अर्पण केले होते. या दागिन्यांचा ताळेबंद लागत नसल्याने संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. तुळजाभवानीला छत्रपती घराण्यातील अनेकांनी दागिने अर्पण केल्याचा उल्लेख आढळतो, मात्र या दागिन्यांचा ताळेबंद लागत नाही. यातील अनेक दागिने गहाळ झाले आहेत.

या गहाळ झालेल्या दागिन्यांबाबत लवकर चौकशी करावी, त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करावा. त्याचबरोबर यापुढे दागिन्यांची मोजणी ही कॅमेऱ्यासमोर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही चौकशी न केल्यास स्वराज्य पक्षाच्या वतीने जन आंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी अर्पण केलेले अलंकार व दागिन्यांची मोजदाद करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी एक पंच समिती नेमली होती. त्यात अंकाउट ऑफिसर, धार्मिक विधी करणारी मंडळी, नायब तहसीलदार आणि पुजाऱ्यांपैकी काहींचा समावेश करण्यात आला होता. या समितीने देवीला अर्पण केलेल्या १९६६ पासून दागिन्यांची मोजदाद केली. याबाबत मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकाऱ्यांनी २७ पानांचा अहवाल सादर केला आहे. यात देवीचे काही अलंकार गहाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देवीच्या अलंकारांची १९६३, १९७१, २०१२, २०१८ मध्ये मोजदाद झालेली होती. यात देवीचे सुमारे २५० किलो सोने आणि चार-पाच हजार किलो चांदी असल्याचे समोर आले. यानंतर नित्योपतारातील शिवकालीन अलंकारांची मोजदाद सुरू केली. यात १ ते ७ क्रमांकांतील सहाव्या डब्यातील सात ते दहा पौराणिक अलंकार गायब असल्याचे स्पष्ट झाले.

यात देवीच्या खडावा, माणिक, पाचू , मोती यांचा समावेश आहे. हे अलंकार कधी गायब झाले, याबाबत माहिती मात्र समोर येत नाही. हा अहवाल अंतरिम असून यावर जिल्हाधिकारी ओंबासे यांनी पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी एका आठवड्याची मुदत दिलेली आहे. यावेळी १९६३ च्या दप्तराशी आताच्या नोंदीची तपासणी केली जाणार आहे.

या मंदिरातील सोने चोरीला गेल्याबाबत 'सीआयडी'ने गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे हे दागिने गायब आहेत की चोरीला गेले आहेत, याबाबत सध्या काही सांगता येत नसल्याचे समितीतील पंचाचे म्हणले आहे. तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या काही अलंकारावर शिवकालाचा, मुघल शासकांचा उल्लखे होता. हे अलंकार अनमोल होते. तेच आता गायब झाल्याने राज्यात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT