Thane News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी पुन्हा हाती घेतली आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई लढली जात असताना दुसरीकडे पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्यात कोणीही नाराज होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहराची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. (Jumbo executive of Thane NCP announced)
ठाणे शहराच्या कार्यकारिणीमध्ये २५ उपाध्यक्ष, १० सरचिटणीस, १० चिटणीस, ३२ सचिव, चारही विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला कार्याध्यक्ष, आदींसह विविध सेलच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवकांची फळी मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून (अजित पवार-शरद पवार गट) संघटनात्मक बांधणी करण्यासाठी दौरे, सभा, त्याचबरोबर पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विविध सेलच्या, विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीही अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर सुहास देसाई यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी शनिवारी (ता. २१ ऑक्टोबर) शरद पवार गटाची ठाण्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत कोणीही नाराज होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. ज्यांना पक्षाकडून संधी मिळत नाही, ते इतर पक्षात उडी मारतात, हा अनुभव लक्षात घेऊन अनेकांना संधी देण्याच्या प्रयत्नात ही कार्यकारिणी प्रचंड मोठी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देसाई यांनी उपाध्यक्षपदी २५ जणांना संधी दिली आहे. ही संधी देताना ज्यांना आतापर्यंत डावलण्यात आले होते, त्यांना संधी देत आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरीकडे सरचिटणीसपदीही १० जणांना, चिटणीस पदावर १० जणांना आणि तब्बल ३२ जणांना सचिव पदावर संधी देण्यात आलेली आहे. पक्षाच्या संघटनेच्या तिजोरीच्या चाव्या अर्थात खजिनदारपदी माजी नगरसेवक अमित सरय्या यांची निवड झाली आहे.
ठाणे शहरातील चारही विधानसभेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये मनोहर साळवी, मिलिंद पाटील, महेश साळवी, शानू पठाण, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह ३८ जणांना स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विक्रम खामकर, मयूर शिंदे यांची युवक कार्याध्यक्षपदी, तर युवती अध्यक्षपदी पल्लवी जगताप यांना संधी देण्यात आलेली आहे. सामजिक न्याय, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, व्यापारी, असंघटीत कामगार, लीगल, वैद्यकीय, हॉर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, सोशल मीडिया आदी विभागाच्याही नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय महिला आघाडीची फळीही मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.