Kalyan Loksabha News Sarkarnama
मुंबई

Kalyan Loksabha News : बाळा नांदगावकराकडून खासदार शिंदेंचं कौतुक तर ठाकरे पिता-पुत्रांना चिमटा; म्हणाले...

Loksabha Election 2024 : शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan Dombivli News: शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.याचवेळी खासदार शिंदेंच्या प्रचाराचा धडाका सुरुच आहे.अशातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खासदार शिंदेंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुण दिसत असून हे गुण सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये दिसत नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंना चिमटा काढला. हाच धागा पकडून एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी,दुसरीकडे खाण तशी माती, असा टोलाही नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवारी (ता.1) करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. या मेळाव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर,आमदार राजू पाटील,माजी आमदार प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर,शहराध्यक्ष राहुल कामत, यांच्यासह मनसेचे कल्याण लोकसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि राजसाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते. तसेच नाते आज राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असून ही निवडणूक देशाची आहे.त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींजींचे हात बळकट करणे,हे आपले कर्तव्य असल्याचे डॉ.श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.तसेच ४ जून रोजी ज्यावेळेस कल्याण लोकसभेचा निकाल लागेल,त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांचाही त्यात तितकाच वाटा असेल,असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे म्हणाले, ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली,ते विचार सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचे काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केली.जे लोक सावरकरांना शिव्या देतात,त्यांचे शिवतीर्थावर स्वागत करण्याची नामुष्की यांच्यावर आले. आज एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मत देणार असल्याची घणाघाती टीकाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली. कोरोनामध्ये राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा हे घरात बसून घोटाळे करत असल्याचे सांगत यांच्याकडे 'सिम्पथी' नव्हे, तर फक्त संपत्ती असा हल्लाबोलही खासदार श्रीकांत शिंदेंनी यावेळी केला.

तर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) म्हणाले, श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार असल्याचे समजून काम करा.आपण सर्वांनी जोमाने काम करायचे असून आपले काम ४ जून रोजी मतपेटीतून दिसले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT