Hitendra Thakur Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : पालघरमध्ये महायुती अन् महाआघाडीचं ठरेना, 'बहुजन विकास आघाडी'चा सावध पवित्रा!

संदीप पंडित

Palghar Lok Sabha Constituency News : लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन जवळपास आठपेक्षाही अधिक दिवस झाले असून, पालघर लोकसभेसाठी उमेदवारीचा तिढा ना महायुतीला सोडविता आला ना महाविकास आघाडीला. त्यामुळे या मतदारसंघात ज्यांच्याकडे मतांची जास्त ताकद आहे, त्या बहुजन विकास आघाडीला मात्र सावध भूमिका घ्यावी लागली आहे.

'बविआ'(Bahujan Vikas Aaghadi)च्या कार्यकर्त्यांची मात्र उमेदवार उभा करण्याची मागणी असल्याने हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. त्यातच हितेंद्र ठाकूर हे तीन दिवसांपासून मुंबईबाहेर असल्याने वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर हे दिल्लीला गेल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमधून पालघरच्या जागेवर ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने दावा सांगितलेला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून भारती कामडी यांचे नाव संभाव्य यादी आले असले तरी अजून जाहीर झालेले नाही. त्या ठिकाणी वेगळा उमेदवार देण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीने उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.

तर दुसऱ्या बाजूला महायुतीतून विद्यमान शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवर शिंदे गट ठाम आहे. परंतु राजेंद्र गावित यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध होत आहे. यावर चर्चेने तोडगा निघेल, असे भाजप आणि शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

युती आणि आघाडीचे ठरत नसल्याने 'बविआ'नेही या ठिकाणी सावध पाऊलं टाकण्याचे धोरण अवलंबिले आहे. दरम्यानच्या काळात 'बविआ'चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे तीन दिवसांपासूून मुंबई बाहेर गेल्याने अनेक तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.

पालघरमध्ये भाजपला पुन्हा आपले बस्तान बसवायचे असल्याने भाजपने ठाकूर यांनी दिल्लीत बोलावले असल्याची चर्चा येथे सुरू आहे. हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur) हे दिल्लीत गेल्याने या वेळी ते पालघर लोकसभेसाठी आपला उमेदवार देणार नाहीत, असे बोलले जात आहे.

बहुजन विकास आघाडीने पालघरमध्ये आपला उमेदवार उभा न केल्यास पालघरधील त्यांचे अस्तित्व पणाला लागू शकणार आहे. लोकसभेतील निर्णयाचा फटका त्यांना विधानसभेलाही बसण्याची शक्यता आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सेना भाजपच्या कार्यकर्त्यांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने बहुजन विकास आघाडीने सावधपणे पावले टाकण्याचे धोरण अवलंबिले आहे.

यापूर्वी दोन्ही काँग्रेस देशात सत्तेवर असतानाही बहुजनने आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला होता. परंतु यावेळची परिस्थिती मात्र वेगळी असल्याने 'बविआ'ने अजूनपर्यंत तरी आपले पत्ते ओपन केले नसल्याचे बोलले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT