Devendra Fadnavis - Narendra Modi  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : " येत्या निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवणं हे भाजपसाठी नाहीतर भारतासाठी महत्त्वाचं..."

BJP Political News : " जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधानांना बॉस म्हटलं जातं..."

Deepak Kulkarni

Mumbai : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठका, मेळावे, शिबिरं, दौरे, भेटीगाठींसह इन्कमिंग - आउटगोइंगनेही वेग पकडला आहे. यातच भाजपने तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील 'महाविजय'चा निर्धार बोलून दाखवतानाच त्यासाठी मास्टर प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे.

याचदरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देतानाच येत्या निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपसाठी नाहीतर भारतासाठी महत्त्वाचे आहे असं विधान केलं आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी भाजप महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केले. त्यांनी या कार्यक्रमात विरोधी पक्षावर निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी(Narendra Modi) करत आहेत. मिशन 2024 हे भाजपपेक्षा भारतासाठी महत्त्वाचं आहे. देशाकरता त्याग करण्याची क्षमता असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या मार्गाने देशाला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी आपण लढाई दिली पाहिजे. यासाठी जो त्याग आहे, तो आपण निश्चित करू शकतो. येत्या निवडणुकीत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हा आपला संकल्प असल्याचेही फडणवीस या वेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. मागील 9 वर्षांत भारत बदलला आहे, भारतात गरिबीतून लोक बाहेर येत असल्याचे खुद्द युनायटेड राष्ट्राने सांगितलं आहे. ज्या भारताला कुपोषितांचा देश म्हटलं जातं होत, त्याचे परिवर्तन 9 वर्षांत झाले. भारताने प्रगतीचा वेग वाढवला आहे, असेही ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. मोदीजींच्या खंबीर नेतृत्वामुळे हे संभव झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आल्याचेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे २०२४ चा महाविजय भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.(BJP)

पंतप्रधान मोदींचे खंबीर नेतृत्व यामुळे हे संभव झालं आहे. जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधान यांना बॉस म्हटलं जातं. मोदींनी जो भारत तयार केला, त्याशिवाय आता कुणाचे चालणार नाही. म्हणून आपल्या पाठीशी सर्व उभे आहे. काही शक्ती यामुळे घाबरल्या आहेत. ही वाटचाल कशी थांबवता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातील काही जण त्याला बळी पडत आहेत. भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे त्याग करावा लागणार आहे.

" राहुल गांधी यांच्याबाबत लोकांच्या मनात..."

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांची 'इंडिया' आघाडी आपल्याला लढा देऊ शकत नाही, लोक ज्यावेळी मोदींंचा विचार करतात. त्यावेळी राहुल गांधी यांच्याबाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हे पक्के आहे. इंडिया आघाडीत आपापसांत वाद आहे. आतापासून यांची स्थिती अशी आहे की, हे एकत्र राहू शकत नाहीत. यांच्यातील एकही राष्ट्रीय नेता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

" शरद पवारांचं केरळमध्ये भाषण ठेवलं, तर..."

फडणवीस म्हणाले, निवडणुकीच्या आधी हे एकत्र राहू शकत नाहीत आणि नंतरही राहू शकत नाहीत. त्यांच्यात एकही राष्ट्रीय नेता नाही. आज मोदीजी कुठेही गेले तरी गर्दी असते. शरद पवारांचं केरळमध्ये ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशमध्ये, अखिलेश यादव, स्टॅलिन यांचे भाषण इतर राज्यात ठेवले तर कोण येणार आहे, असा चिमटाही फडणवीसांनी आघाडीला काढला.

देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, सध्या विरोधकांचा एकच संकल्प, तो म्हणजे मोदीजींचा विरोध करणे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहेत. हे समोर आहेत, पण यांच्या पाठीशी एक शक्ती आहे, ज्या शक्तीला अराजकता निर्माण करायची आहे. चीनमधून या लोकांना फंडिंग केले जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

...तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस!

आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आले असले, तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस. युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहाेचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांनासुद्धा निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर असेल, असेही फडणवीस म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT