vijay wadettiwar, manoj jarange patil Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : ...गोळीबारानंतर हिरो झाले, वडेट्टीवारांची टीका; राहुल गांधींनी हेच शिकवलं का? जरांगेंचा टोला

Maratha Reservation Vijay Wadettiwar vs Manoj Jarange Patil : आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा असा वाद रंगला आहे. आता विजय वडेट्टीवार आणि जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत...

Digvijay Jirage

Maratha Reservation In Maharashtra : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर जरांगे हे मराठा समाजाचे हिरो झाले. त्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे 'हम झुका सकते है' असा गर्व जरांगेंना झाला आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार आधीपासून करत आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांनाही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. "आम्ही हिरो झालो नाही. आम्ही स्वतःला हिरोही समजत नाही. असले फालतू शब्द बोलायचे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचे काम तुमचे आहे.

मराठ्यांविरोधात तुमच्या मनात द्वेष आहे. तुम्ही मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकत नाही. आम्हाला सल्ले देऊ नका. राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवले आहे का? मराठ्यांना विरोध करण्यासाठी तुम्हाला घटनात्मक पद त्यांनी दिले आहे का?" अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'जरांगेंना गर्व, ते धमक्या देत आहेत'

"ओबीसीत ३७२ जातींमध्ये येऊन मराठा समाजाला काही फायदा मिळणार नाही. आता खुल्या प्रवर्गात जास्त जाती राहणार नाहीत. नोकऱ्यांचा किंवा सोयी सवलतींचा जिथे संदर्भ येतो तिथे मराठा तरुणांचे फार मोठे नुकसान होणार नाही, अशा स्थितीमध्ये जरांगे यांनी अभ्यास करून आपण कोणाला साथ देत आहोत. आपले हित कशात आहे? याचा विचार केला पाहिजे", असा सल्लाही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.

"कोणाच्या डोक्यात कोणते वारे घुसले काय माहीत. कोणीतरी येतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतं. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण फेटाळल्यानंतर दोन वर्षे ते शांत होते. ईडब्ल्यूएसमधून अधिक फायदा आहे, हे त्यांना माहीत होते. परंतु, गोळीबार झाला आणि त्यानंतर जरांगे हे मराठा समाजाचे हिरो झाले. 'हम झुका सकते है' असा त्यांना गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात. ओबीसीत येऊन मराठ्यांना फायदा होणार नाही", असे वडेट्टीवार पुढे म्हणाले.

'यासाठी तुम्हाला घटनात्मक पद दिलंय का?'

जरांगे यांनीही वडेट्टीवार यांना फैलावर घेतले. "वडेट्टीवार काय त्यांची पुढची पिढीसुद्धा काही करू शकत नाही. मराठा समाजाने तुम्हाला ओळखले आहे. आम्ही हिरो होण्यासाठी नव्हे तर न्याय देण्यासाठी लढत आहोत. वंशावळीच्या नोंदी मिळाल्यावरही तुम्ही तीन-चार लोक विरोध करत आहात. तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे शत्रू झाला आहात.

तुम्हालाच मराठ्यांच्या पोरांचं कल्याण नको आहे. आम्ही सामान्य माणसं आहोत. सामान्यांसाठी लढत आहोत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. विरोधी पक्षनेता जनतेला न्याय देण्याचे न्याय मंदिर असते, पण त्यांनाच गर्व झाला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळवू देणार नाही, सरकारला झुकवतो, अशा बाता मारता. तुम्हाला पक्ष मोठा करण्यासाठी पद दिले आहे. राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवले आहे का? राहुल गांधींनी मराठ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तुम्हाला घटनेचे पद दिले आहे का?", असा सवाल त्यांनी केला.

"वडेट्टीवार यांनी आता तिसरं पिल्लू सोडलं आहे. मराठा समाज एकत्र आल्याचा मला गर्व आहे. वडेट्टीवारांची विचारधारा विष पेरणारी आहे," असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT