Manoj Jarange-Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Morcha : '...आता हा शेवटचा लढा समजूनच आम्ही मुंबईकडे निघालो आहोत!'

Anand Surwase

Manoj Jaranage News : आमच्या मुलांच्या भविष्यासाठी..मराठा आरक्षणासाठी आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही 'करेंगे या मरेंगे' या भूमिकेत मुंबईला निघालो आहोत. त्यामुळे आता काहीही झाले तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईमधून परतणार नाही. आरक्षणाच्या या लढ्यात आम्ही मरेपर्यंत उपोषण करण्यासही तयार आहोत. मात्र, आता हा शेवटचा लढा समजूनच आम्ही मुंबईकडे निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मुंबईकडे निघालेल्या मोर्चातील नारायणराव काळे या मराठा आंदोलकाने दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. सरकारला मुदत देऊनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. याउलट निर्दयीपणे मराठा समाजाची आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. त्यातच आरक्षण मिळेना म्हणून हताश होत, अनेक मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.

आरक्षण नसल्यामुळे मुलांच्या हातच्या नोकऱ्या चालल्या.. बेरोजगारी वाढली.. आर्थिक मागासलेपण आल्याची भावना गरजवंत मराठा समाजाला अधिक त्वेषाने जाणवू लागली. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेतून गरजवंत मराठा समाज आता पेटून उठला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज आता निर्णायक टप्प्यावर आल्याचे उदाहरण म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्यने मुंबईकडे निघालेला मोर्चा आहे.

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरदार सोडून मराठा समाज मुंबईकडे जाण्यासाठी मोर्चात सहभागी झाला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व अंतरवाली सराटीचे मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजानेच या लढ्याचे नेतृत्व जरांगे पाटील यांच्याकडे सोपवले आहे. तब्बल 40 वर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे एक आशेचे किरण ठरले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेवर मराठा समाज अनिश्चित कालावधीसाठी मुंबईत धडकण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. या मोर्चामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी मराठा मोठ्या उस्फुर्तपणे सहभागी झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 2O जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मार्गस्थ झालेल्या या मोर्चात, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गरजवंत मराठा बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी हे मराठे स्वखर्चाने मुंबईकडे मार्गस्थ होत आहेत. यासाठी गावागावतून वाहनाची सोय करत मुक्कामाच्या ठिकाणी वेळ पडल्यास स्वत:सह गरजू मराठ्याच्या पोटाची सोय होण्याइतपत तेल, तांदूळ, पीठ, चटणी असा शिधा सोबत घेऊन हे मराठे मोर्चात सहभागी झाले आहेत.

मुलांच्या भविष्यासाठी करेंगे या मरेंगे...

या मोर्चात बीड जिल्ह्यातून सहभागी झालेल्या नारायण काळे या मराठा बांधवाशी सरकारनामाच्या प्रतिनिधीने संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काळे म्हणाले की, आम्ही मोर्चात सहभागी झालो आहे, ते आरक्षण मिळण्यासाठी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी..सहकार्य करण्यासाठी, आमच्या मुलांच्या प्रश्नासाठी आम्ही हा करेंगे या मरेंगे या भूमिकेतून हा लढा लढतोय, मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा गेली 40 वर्षापासून सुरू आहे.

...हे अश्रूच आरक्षण का हवे आहे?

आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी स्वत:वर गोळी चालवून आत्मबलिदान दिले. त्यानंतर विनायक मेटे यांनीही शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणाचा लढा लढला. त्याप्रमाणे आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मुलांबाळांसाठी हा लढा लढत आहेत. साष्टी पिंपळगाव मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिने आंदोलन केले तर या सरकारने त्यांच्यावर लाठीहल्ला केला.

निर्दयीपणे मराठा समाजाला मारहाण केली. त्यामुळे आता आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला निघालो आहोत. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही हा लढा लढतोय हे सांगताना नारायणराव काळे यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले आणि हे अश्रूच आरक्षण का हवे आहे? याचे उत्तर देऊन जात होते.

आम्ही मुंबईत जात आहोत ते मराठा आरक्षण घेऊन येणाच्या निर्धारानेच चाललो आहोत, त्यामुळेच आम्ही 15, 20 दिवस किंवा जरांगे पाटील म्हणतील तोपर्यंत मुंबईत राहण्याच्या तयारीने निघालो आहोत. मुंबईत गेल्यानंतर आम्ही मरेपर्यंत उपोषण करू मात्र आता मागे हटणार नाही. कारण हा आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी भूमिका देखील काळे यांनी स्पष्ट केली.

मोर्चामध्ये अबाल वृद्ध दिव्यांगाचाही समावेश

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मुंबईकडे(Mumbai) निघालेल्या मोर्च्यामध्ये सर्वच वयोगटातील मोर्चेकरी सहभागी झाल्याचे दिसनू येत आहे. या मोर्चात जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या भविष्यासाठी माता भगिणींचाही मोठा सहभाग आहे.सध्या थंडीचे दिवस आहेत असे असतानाही मोर्चामध्ये 1 वर्षाच्या मुलाला सोबत असलेली माता, ते 80 वर्षांच्या वृद्धांचाही समावेश आहे. तसेच मोर्चामध्ये काही दिव्यांग बांधवाचाही समावेश आहे.

सर्व जातीय समाज बांधवांकडून सोय...

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आमचा त्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा असल्याचे मत गावोगावच्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एवढेच नाहीतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेला मराठा समाजाचा मोर्चा ज्या मार्गाने मार्गस्थ होत आहे. त्या मार्गावर मराठा समाजाच्या भोजनाची, चहा नाश्त्याची व्यवस्था ही सर्व जाती धर्मातील नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे या मोर्चावेळी पाहायला मिळाले.

आरक्षणाची मागणी करणारा हा मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कुच करत आहे. यासाठी सर्वजाती धर्मांचा पाठिंबा आहे. असे असतानाही सरकारकडून जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचा , आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मराठा समाजाने आता हा लढा निर्णायक पातळीवर नेऊन ठेवला आहे. याकडे सरकार गाभींर्याने लक्ष देऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करणार की मराठा समाजाला आणखी वेठीस धरणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT