Obc Reservation Maharashtra News : मराठ्यांना मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपमंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आज सकाळी राज्यातील ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व नेत्यांनी भुजबळांना पाठिंबा दिला. प्रकाश शेंडगे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.
मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करा आणि आम्ही बाहेर राहून लढू. त्यांनी मंत्रिपद सोडू नये, असं आवाहन आम्ही छगन भुजबळांना बैठकीत केल्याचं शेंडगे म्हणाले. आता आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्त रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. दिवाळी संपल्यानंतर आमचं राज्यभर आंदोलन सुरू होईल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही स्थितीत धक्का लागू देणार नाही, असा शब्द राज्य सरकारने दिला होता. सुरुवातीला सांगितलं निजामकाळातील जुन्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ, असं सरकारने म्हटलं होतं. आम्ही मान्य केलं, पण आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्यास सांगितलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसींमध्ये समावेश करायचा, हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेला नाही, हे यापूर्वी स्पष्टच केलेलं आहे. म्हणून कुणबी दाखला दिला म्हणून मागासवर्गीय होतो का? जात बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. असे दाखले दिली तरी आम्ही न्यायालयाची लढाईही लढण्याचा निर्णय घेतला आहे. समितीन नेमून कुणाला मागावर्गीय करता येत नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग आहे. जी समिती नेमले, जो काही आयोग नेमला, त्यात सगळे मराठा समाजाचेच आहेत. समितीचे प्रमुख भोसले, शिंदे आणि गायकवाड हे सगळे मराठा आहेत. मराठा समाजाच्या लोकांकडून अहवाल घ्यायचा आणि ओबीसींनी काय करायचं?, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला.
आपलं आरक्षण हे हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे. कारण हे सर्व प्रस्थापित मंडळी आहेत. आमदार, खासदार सर्व यांचेच आहेत. मुख्यमंत्री यांचे आहेत आणि केंद्रातलं सरकारही यांचच आहे. यामुळे सर्व ओबीसींनी एकजूट व्हावं. दिवाळीनंतर ओबीसींचा पहिला मेळावा हा १७ नोव्हेंबरला जालना जिल्ह्यातील अंबडला होणार आहे. २६ नोव्हेंबरला हिंगोलाला दुसरा मेळावा होईल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि विदर्भातही आम्ही मेळावे घेणार आहोत, असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.