Mumbai News : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सध्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडत आहे. आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष मागील सुनावणीवेळी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे आज पुन्हा त्यांच्या साक्षीने कामकाजाला सुरुवात झाली.
आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात आजपासून सलग पुढील पाच दिवस सुनावणी पार पडणार आहे. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी, सुनील प्रभू यांची आणखी उलट साक्ष घेणार आहेत. या बरोबरच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपबाबत शिवसेना कार्यालय कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले होते. तसेच 31 डिसेंबरपर्यंत अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून, आता मॅरेथॉन सुनावणी पार पडत आहे.
गेल्या सुनावणीवेळी दोन्ही गटांकडून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले होते, तर विधानसभा अध्यक्षांसमोर युक्तिवादावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगीही झाली होती. त्यामुळे पुढील पाच दिवस होणाऱ्या सुनावणीत काय-काय घडतं, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी या सुनावणीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आज पुन्हा उलट तपासणी होणार आहे. उलट तपासणी संपल्यानंतर इतर कुणाची उलट तपासणी घ्यायची असल्यास त्यांची नावं पुढे दिली जातील. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने ते दिले जातील. या सुनावणीसाठी फक्त 16 दिवस असल्याचे अध्यक्ष म्हणतात. वेळ फार कमी आहे, हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष व्यस्त असतील, त्यामुळे त्यांनी शनिवार व रविवारीही सुनावणी घ्यायला हवी," असं सरोदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.