Milind Narvekar Meet Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Milind Narvekar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर आमदार मिलिंद नार्वेकरांचे मोजक्याच शब्दांत सूचक ट्विट

Vijaykumar Dudhale

Mumbai, 15 July : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीपूर्वी शिवसेनेचे सचिव तथा विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेतील यशानंतर नार्वेकर यांनी पवारांना भेटून त्यांना निवडणुकीतील यशाबाबत माहिती दिली. या भेटीबाबत नार्वेकर यांनी मोजक्याच पण सूचक शब्दांत भाष्य केले आहे.

विधान परिषदेतील यशानंतर मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज (ता. 15 जुलै) सकाळीच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांनी पवारांच्या भेटीची वेळ मागितली होती, त्यानुसार पवार यांनी नार्वेकर यांना आज भेटीसाठी वेळ दिली होती. त्यानुसार आज नार्वेकर हे शरद पवार यांना भेटायला गेले होते. पवारांच्या भेटीचा फोटो ट्विट करत त्यांनी भेटीबाबत दोनच शब्दांत माहिती दिली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर ‘पवार साहेबांचा आशीर्वाद’ असे सांगत भेटीचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील शह कटशहाच्या राजकारणाबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यात काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पवारांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते जयंत पाटील यांना न मिळाल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट होते. जयंत पाटील यांनीही तसे बोलून दाखवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकच उमेदवार दिला जाईल, अशी निवडणुकीपूर्वी चर्चा होती. तसा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून गेल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेनेकडून नार्वेकर यांना रिंगणात उतरवून जिंकून आणले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ते कोणालाही भेट नव्हते. मात्र, आज सकाळीच मिलिंद नार्वेकर यांना भेटीची वेळ दिली होती. त्या वेळेनुसार नार्वेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीचा नार्वेकर यांनी फोटो ट्विट करत ‘पवार साहेबांचा आशीर्वाद’ असे ट्विट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT